सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री, नव्या युगाचा प्रारंभ

वृत्तसंस्था / पाटणा

भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केले आहे. बुधवारी येथील ‘लोक भवन’ येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे या राज्यातील नितीश कुमार यांचे युग समाप्त झाले असून नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. सम्राट चौधरी यांच्या रुपाने प्रथमच भारतीय जनता पक्षाला बिहार राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. चौधरी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे नेते बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय चौधरी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केले. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर केला जाणार आहे.

57 वर्षांचे सम्राट चौधरी यांना बिहारचे राज्यपाल सय्यद अता हुसेन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात चौधरी उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन हे विभाग देण्यात आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे विभाग त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.

आक्रमक मागासवर्गीय नेते

कोयरी-कुशवाह या मागासवर्गीय समाजाचे असणारे सम्राट चौधरी त्यांच्या आक्रमक राजकीय शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. कट्टर हिंदुत्ववादी नेता असाही त्यांचा परिचय आहे. एकेकाळी त्यांचे नितीश कुमार यांच्याशी मोठ्या प्रमाणात मतभेद होते. तथापि, नंतर हे मतभेद संपवून त्यांनी नितीश कुमार यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे बिहारमध्ये सहजगत्या सत्तांतर घडू शकले. नितीश कुमार यांच्याकडून सम्राट चौधरी यांच्या हाती सूत्रे येताना बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कोणतेही वाद होऊ नयेत, याची पूर्ण दक्षता आघाडीकडून घेतली गेली.

मान्यवरांची उपस्थिती

सम्राट चौधरी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अनेक केंद्रीय नेते, स्थानिक नेते, संयुक्त जनता दलाचे नेते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा व्यक्त केल्या असून नव्या सरकारच्या काळात बिहारची आणखी प्रगती होईल, अशी सदिच्छा कुमार यांच्याकडून दिली गेली.

विजय मिळाल्यापासूनच…

2025 मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रचंड विजय झाला. विधानसभेतल्या 243 जागांपैकी या आघाडीला 202 जागांची प्राप्ती झाली. तेव्हापासूनच बिहारच्या नेतृत्वात परिवर्तन होणार, याचे संकेत मिळू लागले होते. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर काही महिन्यांमध्येच राज्यसभेत जाण्याचा मार्ग स्वीकारला आणि सम्राट चौधरी यांच्या हाती सत्ता सोपविण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव मान्य केला.

घडामोडीची ठळक वैशिष्ट्यो…

सम्राट चौधरी यांच्या रुपाने बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री

जवळपास 21 वर्षे नेतृत्व केल्यानंतर नितीश कुमार युगाची समाप्ती

सम्राट चौधरी यांना मिळणार संजदच्या दोन उपमुख्यमंत्र्यांचे साहाय्य

बिजेंद्र प्रसाद यादव, विजय चौधरी हे दोघे उपमुख्यमंत्रीपदी शपथबद्ध

Comments are closed.