जमीन घोटाळ्याप्रकरणी वाड्रा यांना समन्स बजावण्यात आले आहे

ईडीच्या आरोपपत्राची नोंद घेत न्यायालयाचा आदेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीच्या न्यायालयाने भूमी घोटाळ्याच्या संदर्भात न्यायालयासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठविले आहे. या प्रकरणात वाड्रा हे आरोपी असून प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) याप्रकरणी आरोपपत्र सादर केले आहे. भूमी घोटाळ्यासह वाड्रा यांच्यावर या प्रकरणात मनी लाँडरींग केल्याचाही आरोप आहे.

हे प्रकरण ‘शिकोहपूर भूमी घोटाळा’ या नावाने परिचित आहे. हे 2008 चे प्रकरण असून वाड्ऱा यांच्यावर अत्यल्प दरात मोठ्या प्रमाणात भूमी खरेदी केल्याचा आणि ती वाजवीपेक्षा कितीतरी अधिक किमतीला विकून अवास्तव नफा कमावल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सुशांत छनगोत्रा यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींनी 16 मे या दिवशी न्यायालयात उपस्थित रहावे, असा आदेश दिला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ईडीने या प्रकरणी आरोपपत्र सादर केले. न्यायालयाने या आरोपपत्राची नोंद करून घेतली.

प्रकरण काय आहे…

2008 मध्ये हरियाणातील शिकोहपूर येथे स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अल्प भावाने मोठी भूमी खरेदी केली. रॉबर्ट वाड्रा हे त्या कंपनीचे संचालक होते. हा भूखंड 3.5 एकरचा होता. तो वाड्रा यांच्या कंपनीने ओमकारेश्वर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून विकत घेतला होता. त्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे 2012 मध्ये या कंपनीने या भूखंडाची तब्बल 58 कोटी रुपयांना एक बांधकाम व्यावसायिकाला विक्री केली. केवळ चार वर्षांमध्ये भूखंडाची किंमत आठ पट वाढल्याचे दर्शविण्यात आले. या व्यवहाराच्या काळात देशात आणि हरियाणात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारे होती. ऑक्टोबर 2012 मध्ये हरियाणाचे भूमीव्यवहार महासंचालक आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून राजस्व कागदपत्रांमधील या व्यवहारासंबंधीच्या नोंदी रद्द केल्या. हा व्यवहार हरियाचा भूमीसुधार नियमांच्या विरोधात असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. त्यानंतर काही वर्षांनी ईडीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला.

ईडीचे आरोप

या प्रकरणात ईडीने वाड्रा यांची चौकशी केली आहे. वाड्रा यांनी या प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा अवैध लाभ मिळविल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रकरण सादर करण्यात आले असून आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. आता पुढे काय होणार यासंबंधी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.

आरोपांचा इन्कार

वाड्रा यांनी त्यांच्यावरचे आरोप नाकारले आहेत. केवळ राजकीय सूडबुद्धीने हे प्रकरण सादर करण्यात आले असून केंद्रातील आणि हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार आपल्या विरोधात कारस्थाने करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही गोवण्यात आल्याचा आरोप वाड्रा करीत आहेत. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होत आहे.

वाड्रा यांच्यावर आणखीही प्रकरणे

या प्रकरणाव्यतिरिक्त वाड्रा यांच्याविरोधात आणखीही प्रकरणे नोंद आहेत. राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील भूमी खरेदी, तसेच वादग्रस्त शस्त्रविक्री दलाल संजय भंडारी यांच्या प्रकरणातही वाड्रा यांचे नाव आले असून चौकशी केली जात आहे. 16 जुलैला ईडीने वाड्रा यांच्या मालमत्ता गोठविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. ईडीने 37.64 कोटी रुपये किमतीच्या 43 स्थावर मालमत्ता या प्रकरणांमध्ये गोठविल्या आहेत. या मालमत्तांशी वाड्रा यांचा आणि त्यांची कंपनी स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संबंध आहे, असा आरोप ईडीने ठेवला आहे. ही सर्व प्रकरणे चौकशीच्या विविध टप्प्यांमध्ये सध्या हाताळली जात आहेत.

वाड्रा यांची केंडी

ड हरियाणातील शिकोहपूर येथील भूखंड घोटाळ्यात सुनावणी केली जाणार

ड इतरही दोन तीन भूमी घोटाळ्यांशी वाड्रा यांचा संबंध असल्याचा आरोप

ड वाड्रा यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप असणाऱ्या 43 मालमत्ता जप्त

Comments are closed.