नारा लोकेश यांची टीडीपीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

एन. चंद्राबाबू नायडूंकडून पुत्राला बढती

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी स्वत:चे पुत्र आणि राज्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. पक्षाच्या 44 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पद निर्माण करण्यात आले आहे.

नारा  लोकेश आतापर्यंत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्यरत होते आणि 2024 मध्ये राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यापासून पक्षाच्या संघटनेची धुरा सांभाळत होते. चंद्राबाबू नायडू यांनी याचबरोबर पक्षाच्या संघटनेत मोठे बदल करत 29 सदस्यीय पॉलिटब्युरो, 31 सदस्यीय राष्ट्रीय समिती आणि 185 सदस्यीय राज्य समितीची घोषणा केली आहे.

के. राम मोहन नायडू, बायरे•ाr शबरी आणि राजेश किलारु यांना पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर पल्ला श्रीनिवास राव हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहतील आणि अभिनेता-नेता नंदमुरी बालकृष्ण हे पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणून कायम असणार आहेत.

पक्षानुसार नव्या संघटनेत अनुभव आणि युवा नेतृत्वासोबत सामाजिक संतुलनाची काळजी घेण्यात आली आहे. राज्य समितीत 185 सदस्यांपैकी 50 महिला असून तर मोठ्या संख्येत मागास वर्ग, अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याक समुदायांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

Comments are closed.