छत्तीसगड दुर्घटनेतील मृतांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

‘वेदांता’कडून मृतांच्या वारसांना 35 लाख भरपाईसह नोकरी

वृत्तसंस्था/ सक्ती

छत्तीसगडच्या सक्ती जिह्यातील दाभरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात आतापर्यंत 19 कामगारांचा मृत्यू झाला आहे. 30 हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले आहेत. दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर 13 जणांचा रायगडमधील विविध रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. तसेच रायपूरच्या कालदा रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अनेक कामगार 80 टक्क्यांपर्यंत भाजल्याचेही आढळून आले आहे.

घटनेनंतर लगेचच जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. रायगड येथील जिंदाल फोर्टिस रुग्णालयात दाखल केलेल्या 18 जखमींपैकी 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन कामगारांवर रायगडच्या मेट्रो रुग्णालयात आणि दोघांवर एपेक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या सहा कामगारांना चांगल्या उपचारांसाठी बिलासपूरला पाठवण्यात आले आहे.

या अपघातात एकूण 36 कामगार होरपळले आहेत. यापैकी 12 जण छत्तीसगडचे रहिवासी आहेत, तर इतर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून कामासाठी आले होते. वेदांता कंपनीकडून नुकसान भरपाईबाबतही विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. व्यवस्थापनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी 35 लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, जखमींना प्रत्येकी 15 लाख रुपये मिळतील, असे जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.

Comments are closed.