अंदमानच्या समुद्रात बोट बुडाली.
मलेशियाला निघालेले 250 रोहिंग्या-बांगलादेशी नागरिक बेपत्ता
वृत्तसंस्था/ अंदमान
अंदमान समुद्रात एक बोट उलटल्याने सुमारे 250 रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक बेपत्ता झाले आहेत. संयुक्त राष्ट्र निर्वासित आणि स्थलांतरण संस्थेनुसार, हा अपघात गेल्या आठवड्यात खराब हवामान आणि क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे झाला. ही बोट बांगलादेशहून मलेशियाला जात होती. बांगलादेश तटरक्षक दलाने आपल्या एका जहाजाच्या मदतीने नऊ जणांची सुटका केली, परंतु उर्वरित प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नाही.
2017 मध्ये म्यानमारमधील हिंसाचारानंतर रोहिंग्या समुदायाला मोठ्या संख्येने बांगलादेशात आश्रय घेण्यास भाग पडले. म्यानमार सरकार त्यांना नागरिकत्व देत नाही. दरम्यान, बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमधील वाईट परिस्थितीमुळे अनेकजण मलेशियासारख्या देशांमध्ये चांगल्या जीवनाच्या शोधात धोकादायक सागरी प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यानच दक्षिण बांगलादेशातील टेकनाफ येथून मलेशियासाठी निघालेली एक बोट बुडाली आहे. जोरदार वारे, खवळलेला समुद्र आणि अतिगर्दीमुळे बोट बुडाली. प्राथमिक माहितीनुसार, बोटीत अंदाजे 280 लोक होते. सदर बोट 4 एप्रिल रोजी बांगलादेशातून निघाली होती.
बेपत्ता झालेल्यांमध्ये मोठ्या संख्येने रोहिंगे
या अपघातात बेपत्ता झालेल्यांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत मोठ्या संख्येने रोहिंग्याही होते. बोटीतील रोहिंग्या निर्वासित बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील विस्तीर्ण छावण्यांमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. याठिकाणी म्यानमारच्या रखाइन राज्यातून विस्थापित झालेले दहा लाखांहून अधिक निर्वासित अत्यंत दयनीय परिस्थितीत राहत आहेत.
नऊ जणांना वाचवण्यात यश
बांगलादेश तटरक्षक दलाने (बीसीजी) 9 एप्रिल रोजी इंडोनेशियाला जाणाऱ्या आपल्या एका जहाजाने समुद्रातून एका महिलेसह नऊ जणांची सुटका केल्याची माहिती दिली. बांगलादेशी ध्वज असलेल्या ‘एमटी मेघना प्राईड’ या जहाजाने अंदमान बेटांजवळ खोल पाण्यात काही लोकांना तरंगताना पाहिले. त्यानंतर त्यांची सुटका केली. वाचलेल्यांना नंतर बांगलादेश तटरक्षक दलाच्या ‘मन्सूर अली’ या गस्ती जहाजाच्या ताब्यात देण्यात आल्याचे बीसीजीचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर सब्बीर आलम सुजान यांनी सांगितले.
Comments are closed.