IPL 2026 : मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल; अथर्व अंकोलेकर स्पर्धेतून बाहेर, ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी
इंडियन प्रीमियर लीगचे पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी पंजाबच्या कृष भगत याला संघात स्थान देण्यात आले आहे.
अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सने अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. सोबतच अथर्व लवकर बरा व्हावा आणि पुन्हा मैदानावर परतावा, अशी शुभेच्छा मुंबई इंडियन्सने दिल्या आहेत.
कोण आहे कृष भगत?
21 वर्षीय कृष भगत हा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा एक प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलद गोलंदाजी करतो. गेल्या दोन वर्षांपासून तो मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्सचा भाग आहे. 2026 च्या डीवाय पाटील टी-20 कपमध्ये त्याने ‘रिलायन्स’ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामाच्या प्री-सीजनपासून तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून काम करत होता.
निवडीचे मुख्य कारण
मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफने कृषच्या शिस्तीचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे. सराव सत्रांमध्ये आणि सराव सामन्यांमध्ये त्याने सातत्याने आपली छाप पाडली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी आणि मुंबई इंडियन्ससोबतची त्याची प्रगती पाहता, त्याला मुख्य संघात सामील होण्याची ही मोठी संधी मिळाली आहे.
Comments are closed.