IPL 2026 – चेन्नईला मोठा धक्का, स्टार गोलंदाज दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) हा संघ या हंगामातही चांगली कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून, त्यांचा पुढचा सामना 18 एप्रिल रोजी हैदराबादविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईचा स्टार वेगवान गोलंदाज खलील अहमद याला दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला ही गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 17 वी ओव्हर टाकत असताना खलीलच्या उजव्या मांडीच्या स्नायूंना (Quadriceps) दुखापत झाली. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी धावत असताना त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या, ज्यामुळे त्याला आपली ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले. वैद्यकीय तपासणीत त्याला ‘ग्रेड 2’ ची गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला किमान 10 ते 12 आठवड्यांचा काळ लागणार आहे, याचाच अर्थ तो या हंगामात पुन्हा खेळू शकणार नाही.

या दुखापतीपूर्वी खलीलने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने पॉवरप्लेमध्ये केवळ 17 धावा देऊन सुनील नरेनचा महत्त्वाचा बळी घेतला होता. या हंगामातील चेन्नईच्या सर्व पाच सामन्यांमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. संघाने त्याच्यावर दिलेली जबाबदारी तो चोख बजावत होता, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी भरून काढणे चेन्नईसाठी मोठे आव्हान असेल.

एकीकडे चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान स्पर्धेच्या अशा महत्त्वाच्या टप्प्यावर खलीलसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसणे ही कर्णधार आणि व्यवस्थापनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. आता खलील अहमदच्या जागी चेन्नई सुपर किंग्स संघ कोणत्या नवीन खेळाडूला संधी देणार, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.