IPL 2026 Orange Cap: विराट कोहलीचा दबदबा, जगातील फलंदाज पडले मागे!
आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर या यादीत बदल होत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे अव्वल फलंदाजांच्या धावांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर आकडे बदलत आहेत. ज्यामुळे स्पर्धा अधिकच रंगतदार बनली आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता विराट कोहलीने ऑरेंज कॅपवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
विराट कोहलीने आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने पाच सामन्यांत एकूण 228 धावा केल्या आहेत. कोहली 57 च्या सरासरीने आणि 158.33 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. त्याच्या नावावर 25 चौकार आणि 8 षटकार आहेत. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोहलीने 49 धावांची खेळी केली. मात्र तो अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. या सामन्यात तो पूर्ण फिट नव्हता, त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला खेळवण्यात आलं होतं.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने पाच सामन्यांत 224 धावा केल्या असून कोहलीपेक्षा तो फक्त 4 धावांनी मागे आहे. क्लासेनने 44.80 च्या सरासरीने आणि 142.68 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. त्याच्या नावावर 13 चौकार आणि 8 षटकार आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर रजत पाटीदार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार पाटीदारने 5 सामन्यांत 222 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 55.50 असून स्ट्राइक रेट तब्बल 213.46 आहे. त्याने 12 चौकार आणि 21 षटकार ठोकले आहेत. चौथ्या क्रमांकावर ईशान किशन आहे, ज्याने 5 सामन्यांत 213 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 22 चौकार आणि 12 षटकार आहेत.
दरम्यान, वैभव सूर्यवंशी पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 5 सामन्यांत 200 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 40 असून तो 263.16 च्या भन्नाट स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. त्याने 18 चौकार आणि 18 षटकार लगावले आहेत.
एकूणच, IPL 2026 मधील ऑरेंज कॅपची शर्यत अधिकच रोमांचक बनली असून पुढील सामन्यांमध्ये यात आणखी मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
Comments are closed.