व्हर्जिनियाचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर जस्टिन फेअरफॅक्स यांनी पत्नीची हत्या करून उचलले टोकाचे पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

व्हर्जिनियाचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर जस्टिन फेअरफॅक्स यांनी त्यांच्या विभक्त पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसीमधील ॲनांडेल येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. फेअरफॅक्स काउंटीचे पोलीस प्रमुख केविन डेव्हिस यांनी या घटनेची पुष्टी केली असून, 47 वर्षीय जस्टिन फेअरफॅक्स आणि त्यांच्या 49 वर्षीय पत्नी डॉ. सेरिना फेअरफॅक्स यांचे मृतदेह घरातून ताब्यात घेण्यात आले आहेत. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, फेअरफॅक्स यांनी घराच्या तळघरात पत्नीवर गोळी झाडली आणि त्यानंतर वरच्या मजल्यावर जाऊन स्वतःचे जीवन संपवले.

घडलेल्या घटनेची माहिती त्यांच्या मुलाने 911 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना दिली. विशेष म्हणजे, हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत असले तरी मुलांसाठी एकाच छताखाली राहत होते. गोळीबाराच्या वेळी मुलेही घरातच हजर होती, ज्यामुळे या घटनेचा त्यांच्यावर गंभीर मानसिक परिणाम झाला आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, या दांपत्यामध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होते. अलीकडेच एका न्यायाधीशांनी जस्टिन फेअरफॅक्स यांची ढासळती मानसिक स्थिती, अति मद्यपान आणि एकटेपणा यावर चिंता व्यक्त करत त्यांना एप्रिल अखेरपर्यंत घर खाली करण्याचा आदेश दिला होता.

फेअरफॅक्स गेल्या काही काळापासून तीव्र नैराश्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 2019 मध्ये त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली होती. त्यानंतर 2021 मधील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीतही त्यांना अपयश आले. आर्थिक विवंचना आणि कराची थकबाकी यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान डॉ. सेरिना यांनी त्यांच्या मद्यपानाच्या सवयीचा उल्लेख केला होता. जानेवारी महिन्यातही त्यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता, मात्र तेव्हा पोलिसांनी दिलेली तक्रार निराधार ठरवली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण व्हर्जिनिया राज्यात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून पोलीस प्रमुख डेव्हिस यांनी याला कुटुंबासाठी अत्यंत दुःखद प्रसंग म्हटले आहे.

Comments are closed.