नवी मुंबईत भाजप-शिंदे गटाच्या वादात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास लटकणार; नाईक म्हणतात पालिकेला जागा द्या, चौगुले म्हणतात क्लस्टर लागू करा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेला वाद आता नवी मुंबईकरांच्या मुळावर उठू लागला आहे. या वादाचा जोरदार फटका शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला बसणार आहे. झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी महापालिकेकडे जागा हस्तांतरित करा, अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली आहे. तर झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरएऐवजी क्लस्टर लागू करा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे. भाजप आणि शिंदे गट यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्यात बसलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी एमआयडीसीने टेंडर मागवले आहेत. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयडीसीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. या पद्धतीने झोपडपट्ट्यांचा विकास करण्यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप नाईक यांनी करून अप्रत्यक्ष शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. या भूमिकेला विजय चौगुले यांनी कडाडून विरोध केला. झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी एसआरए योजनेऐवजी क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी चौगुले यांनी केली. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीही हीच भूमिका असल्याचे चौगुले यांनी यावेळी स्पष्ट करून त्यांना पाठिंबा दर्शवला.

धोकादायक इमारतींमधील रहिवासी धास्तावले

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झाला. पुनर्विकासाला खीळ घालणाऱ्या सर्व जाचक अटी महाविकास आघाडी सरकारने वगळल्यानंतर शहरात वेगाने बांधकाम प्रकल्प उभे राहिले. मात्र आता भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झाल्यामुळे पालिकेतील काही अधिकाऱ्यांना दोन्ही गटांकडून टार्गेट केले जात आहे. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments are closed.