जिंकता जिंकता हरले… शेवटच्या 10 मिनिटांत हैदराबादने असा उलटवला डाव की चेन्नई पाहतच राहिली; ने
सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 27 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत (Points Table) मोठी झेप घेतली असून 6 सामन्यांत 6 गुणांसह टॉप-4 मध्ये एन्ट्री मारली.
अभिषेक आणि क्लासेनची फटकेबाजी
हैदराबादने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 23 धावा केल्या, पण खऱ्या अर्थाने मैदानात वादळ आणले ते अभिषेक शर्माने. अभिषेकने अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 22 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी खेळली. त्यानंतर हेनरिक क्लासेनने देखील 39 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. मात्र, शेवटच्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी पुनरागमन केल्यामुळे हैदराबादला 200 चा टप्पा ओलांडता आला नाही. सीएसकेकडून वेगवान गोलंदाजांनी आज प्रभावी कामगिरी केली. जेमी ओव्हरटन आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स टिपले. मुकेश चौधरीने सलग दोन चेंडूंवर 2 विकेट्स घेतल्या, तर गुरजपनीत सिंगला 1 विकेट मिळाली. नूर अहमद आज विकेट मिळवू शकला नाही, तरीही त्याने 4 षटकांत केवळ 33 धावा देत धावगतीवर लगाम लावला.
चेन्नईची सुरुवात खराब झाली, पण आयुष म्हात्रेने झुंज दिली
195 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. स्टार फलंदाज संजू सॅमसन केवळ 7 धावा करून नितीश कुमार रेड्डीचा शिकार ठरला. मात्र, युवा फलंदाज आयुष म्हात्रे चांगल्या लयीत दिसत होता, पण 33 चेंडूत 30 धावा करून तो देखील नितीश रेड्डीच्याच चेंडूवर बाद झाला. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात इशान मलिंगाने चेन्नईला मोठा धक्का दिला. कर्णधार ऋतुराज गायकवाड 19 धावांवर बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्सने एके वेळी 10 षटकांत 111 धावा केल्या होत्या आणि त्यांच्या हातात 7 गडी शिल्लक होते. सीएसकेला 60 चेंडूंमध्ये 84 धावांची गरज होती. हातात 7 गडी शिल्लक असल्याने चेन्नईसाठी विजय अगदी सोपा वाटत होता. मग, इशान मलिंगाने अकराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सरफराज खानला बाद केले. तेव्हाच सामन्याचे चित्र पालटले. सरफराजच्या बाद झाल्यानंतर अवघ्या सहा चेंडूंनंतर डेवाल्ड ब्रेविसदेखील बाद झाला. एका अर्थाने, इशान मलिंगाने घेतलेल्या दोन बळींमुळे हैदराबादला सावरण्यास मदत झाली, कारण त्याने सरफराज खान आणि मॅथ्यू शॉर्ट या दोघांनाही बाद केले. या दोन्ही प्रस्थापित फलंदाजांना बाद करून मलिंगाने सीएसकेच्या फलंदाजीवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. चेन्नईची धावसंख्या 3 गडी बाद 111 होती, पण पाहता पाहता 154 धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सीएसकेने 7 गडी गमावले होते. शिवम दुबे शकिब हुसेनच्या गोलंदाजीवर पूर्णपणे फसला आणि क्लीन बोल्ड झाला.
अंतिम क्षणी बाजी पलटली
शिवम दुबे आणि मॅथ्यू शॉर्ट यांच्यासह चेन्नईचे प्रमुख खेळाडू बाद झाले होते. जेमी ओव्हरटनने सूत्रे हाती घेतली. परिस्थितीनुसार सीएसकेला शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज होती. नितीश कुमार रेड्डीने 19 व्या षटकात 12 धावा दिल्या. चेन्नईला आता 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर तीन धावा झाल्या, पण पुढच्याच चेंडूवर प्रफुल्ल हिंगेने नो-बॉल टाकला. सुदैवाने, फ्री-हिटवर षटकार झाला नाही. प्रफुल्ल संपूर्ण सामन्यात खूप महागडा ठरला होता, पण अंतिम षटकात त्याने एकापाठोपाठ एक यॉर्कर टाकले आणि चौथ्या चेंडूवर जेमी ओव्हरटनला बाद करून हैदराबादचा विजय निश्चित केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.