एपस्टीन फाइल्स’वरून लक्ष भरकटवण्यासाठी युद्धाचा घाट घातला, अमेरिकन सैनिकांचा जीव धोक्यात; कमला हॅरिस यांचा ट्रम्प प्रशासनावर हल्लाबोल
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला नको असलेल्या युद्धात ओढले आहे, असे हॅरिस म्हणाल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणविरुद्धच्या लष्करी संघर्षात ट्रम्प यांना जाणीवपूर्वक ओढले असून, यामुळे अमेरिकन सैनिकांचा जीव धोक्यात आला असल्याचा आरोप हॅरिस यांनी केला आहे.
मिशिगनमधील एका कार्यक्रमात बोलताना हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेतील ‘एपस्टीन फाइल्स’च्या वादातून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केल्याचा दावा त्यांनी केला. ट्रम्प प्रशासन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि अकार्यक्षम प्रशासन असून, त्यांच्या अशा निर्णयांमुळे जागतिक स्तरावर अमेरिकेची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
इराणसोबतच्या युद्धावर माजी व्हीपी कमला हॅरिस:
“त्याने युद्धात प्रवेश केला, त्यात बीबी नेतन्याहू यांनी खेचले, आपण त्याबद्दल स्पष्टपणे सांगूया, अमेरिकन सेवा सदस्यांना धोका पत्करून अमेरिकन लोकांना नको असलेल्या युद्धात प्रवेश केला.” pic.twitter.com/Sqn5rghQuD
– मुक्त स्रोत इंटेल (@Osint613) 18 एप्रिल 2026
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षाने अमेरिकेची आंतरराष्ट्रीय जबाबदारी झटकली आहे, असा आरोप हॅरिस यांनी केला. ट्रम्प यांनी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अमेरिका आता आपल्या मित्रराष्ट्रांसाठी अविश्वसनीय देश बनला असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी ट्रम्प कोणत्याही देशावर लष्करी बळाचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी अमेरिकेच्या ‘नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर’चे संचालक जो केंट यांनीही अशाच प्रकारचे आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता, तरीही केवळ इस्रायलच्या दबावाखाली हे युद्ध सुरू करण्यात आले, असे केंट यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
आखाती देशातील युद्ध हा एक मोठा सापळा आहे ज्यामुळे अमेरिकन सैनिकांचे प्राण जात आहेत आणि देशाची संपत्ती वाया जात आहे. ट्रम्प यांना सुरुवातीला हे गणित समजत होते, मात्र आता ते इस्रायलच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेले केंट आता त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात उभे राहिले आहेत.
Comments are closed.