मोठी बातमी – डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल सेवा सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकात विस्कळीत झाल्याने चाकरमानी नागरिकांचे मोठे हाल झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या हजारो प्रवाशांना तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला.

डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरून रिकामी लोकल जात असताना तिचा एक डबा अचानक रुळावरून घसरला. ही घटना डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाउन स्लो मार्गावर घडली. डबा रुळावरून उतरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली.या घटनेमुळे डाउन स्लो मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, मागून येणाऱ्या दोन ते तीन लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या. अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळच्या गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने स्थानक परिसरात आणि फलाटांवर प्रचंड गर्दी झाली होती.

भर उन्हात अनेक प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालत जावे लागले. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ सुरू होती. आठवड्याच्या सुरुवातीलाच उशीर होणार असल्याने चाकरमान्यांची चिंता वाढली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुळावरून घसरलेला डबा पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे

Comments are closed.