MI vs GT: 6, 4, 4, 6, 6, 6, 0: तिलक वर्माची टायटन्सविरुद्ध वादळी खेळी! अवघ्या 'इतक्या' चेंडूंत शतक ठोकत रचला इतिहास

IPL 2026 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच अवघ्या 44 धावांत त्यांचे 3 गडी बाद झाले. त्यानंतर तिलक वर्माने (Tilak verma) आपल्या बॅटने असा कहर केला की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील वातावरणच बदलून टाकले. तिलक वर्माने अवघ्या 45 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकून इतिहास रचला. मुंबईकडून सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम त्याने केला. यासह त्याने सनथ जयसूर्याचा विक्रम मोडीत काढला.

जयसूर्याने देखील 2008 मध्ये मुंबईकडून खेळताना 45 चेंडूत शतक ठोकले होते.18 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सचा एखादा फलंदाज जयसूर्याचा हा मोठा विक्रम गाठण्यात यशस्वी ठरला आहे. तिलक वर्माने नाबाद 101 धावांची तुफानी खेळी खेळली. या 101 धावांपैकी 74 धावा त्याने केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. या धडाकेबाज खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 षटकार लगावले. शेवटच्या 4 षटकांत तिलकने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 16 ते 20 षटकांच्या दरम्यान त्याने केवळ 18 चेंडूंचा सामना केला आणि 65 धावा ठोकल्या. यादरम्यान 18 व्या षटकात या आक्रमक फलंदाजाने अशोक शर्माच्या एकाच षटकात सलग 5 बाउंड्री मारत 26 धावा लुटण्याचा पराक्रम केला. त्याने षटकाराने षटकाची सुरुवात केली आणि त्यानंतर सलग दोन चौकार मारून गोलंदाजाला हतबल केले.

तिलकचा हा धमाका पुढच्या दोन चेंडूंवरही सुरूच होता. त्याने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार खेचून अशोक शर्माच्या गोलंदाजीची डोकेदुखी वाढवली. शेवटचा चेंडू डॉट गेला, तरीही तिलक वर्माने त्या षटकातून भरपूर धावा वसूल केल्या होत्या. विशेष म्हणजे, तिलक वर्माच्या नाबाद 101 धावा ही मुंबई इंडियन्ससाठी दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. मुंबईसाठी सर्वात मोठी धावसंख्या करण्यापासून तो अवघ्या काही धावांनी चुकला. या यादीत पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. सूर्याने IPL 2023 मध्ये 49 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली होती. मुंबईच्या डावाचा विचार केल्यास, तिलक वर्माच्या या शानदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 199 धावा धावफलकावर लावण्यास यशस्वी ठरली.

Comments are closed.