अर्चना पुरण सिंह यांना बाॅलिवुडमध्ये काम मिळेना… अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
अभिनेत्री अर्चना पुरण सिंह अलीकडेच राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या ‘टोस्टर’ या चित्रपटात दिसल्या होत्या. परंतु अर्चना पुरण सिंह यांनी एक वेगळीच खंत बोलून दाखवली. ‘द कपिल शर्मा शो’मुळे त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या आहेत. कुछ कुछ होता हैं, बोल बच्चन, दे दना दन यासारख्या चित्रपटांमधून आपण अर्चना पुरण सिंह यांना पाहिले होते. परंतु सध्या चित्रपट मिळत नसल्याची खंत त्यांनी आता मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
मुलाखतीच्या माध्यमातून अर्चना पुरण सिंह यांनी कबूल केले की एवढी मोठी कारकीर्द असूनही, अजूनही माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहिले जात नाही. लोक मला अभिनेत्री मानत नाहीत; त्यांना वाटतं की मी फक्त खुर्चीत बसून हसणारी एक व्यक्ती आहे.”
न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत अर्चना पुरण सिंह म्हणाल्या, ” कपिल शर्मा या शोमुळे मी इतकी वर्षे चित्रपटांमध्ये काम करू शकले नाही. एकदा मला एका चित्रपटासाठी फोन आला होता. परंतु त्याकरता मला २५ दिवसांच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला जावे लागणार होते. पण ‘द कपिल शर्मा शो’ सोडून दुसरीकडे कुठेही शूटिंग करणे मला शक्य नव्हते. हा शो टीव्हीवर यायचा तेव्हा आम्ही वर्षाला सुमारे १०० एपिसोड्सचे शूटिंग करायचो. यामुळे मला इतर कशासाठीच वेळ मिळत नव्हता. परिणामी, मी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आणि मग काही काळानंतर, लोकांनी हळूहळू मला चित्रपटांसाठी विचारणे बंद केले.”
TV 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, अर्चना पुरण सिंह पुढे म्हणाल्या की, हा शो टीव्हीवरून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यापासून गोष्टी बदलल्या आहेत. आता आम्ही एकामागून एक सीझनचे चित्रीकरण करतो. मी आता वर्षभर हिंदुस्थानात राहण्यास बांधील नाही.
‘टोस्टर’ चित्रपटाबद्दल बोलताना अर्चना पुरण सिंह म्हणाल्या, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटात राजकुमार रावसोबत काम केल्यामुळे त्यांना टोस्टर या चित्रपटात काम करण्यासाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे आता मला आशा आहे की, किमान ‘टोस्टर’मुळे माझ्यासाठी आणखी दोन चित्रपटांचे दरवाजे उघडतील.”
Comments are closed.