Sleep Tips: ‘या’ सवयींनी मिळवा शांत, गाढ झोप

रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करणे, सीरिज बघत बसणे किंवा कामात गुंतून झोपेची वेळ पुढे ढकलणे आजकाल ही सवय अनेकांची झाली आहे.सकाळी उठल्यावर थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो… पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. खरं तर, चांगली झोप ही लक्झरी नाही, तर शरीर आणि मनासाठी अत्यावश्यक गरज आहे. (importance of sleep and how to sleep better tips)

झोपेचे महत्त्व

झोप ही आपल्या शरीरासाठी “रिचार्ज” बटणासारखी आहे. झोपेत शरीर पेशींची दुरुस्ती (Cell Repair) करते आणि स्नायू मजबूत होतात.  तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं, एकाग्रता आणि काम करण्याची क्षमता वाढते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.  म्हणून निरोगी आयुष्यासाठी दररोज किमान 7-9 तासांची झोप खूप गरजेची आहे.

चांगली झोप मिळवण्यासाठी उपाय

1) ठरलेलं वेळापत्रक पाळा
दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. सुट्टीच्या दिवशीही हे रूटीन पाळल्यास शरीराची सवय तयार होते.

2) झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळा
मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा निळा प्रकाश झोपेवर परिणाम करतो. झोपण्याच्या किमान 30-60 मिनिटे आधी स्क्रीनपासून दूर राहा.

3) आरामदायी वातावरण तयार करा
बेडरूम शांत, अंधारी आणि थंड ठेवा. झोपण्यापूर्वी कोमट तेलाने पायांची हलकी मालिश केल्यास रिलॅक्स वाटतं.

4) खाण्यापिण्याच्या सवयी सांभाळा
झोपण्यापूर्वी जड जेवण, चहा-कॉफी किंवा अल्कोहोल टाळा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

५) नियमित व्यायाम करा
दिवसभरात थोडा व्यायाम किंवा चालणे केल्यास रात्री गाढ झोप लागते. मात्र, झोपण्याच्या अगोदर जास्त व्यायाम करू नका.

6) झोपण्याची दिशा
दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपणे फायदेशीर मानले जाते.

7) झोप येत नसेल तर काय कराल?
15-20 मिनिटे झोप न लागल्यास उठून एखादं पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. झोप येऊ लागल्यावरच पुन्हा अंथरुणावर जा.

झोपेचे वेळापत्रक कसे सुधाराल?
झोपेची सवय सुधारण्यासाठी सकाळी उठण्याची वेळ आधी ठरवा आणि दररोज त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्याची वेळ हळूहळू 15-20 मिनिटांनी पुढे आणा, अचानक बदल करू नका. सकाळचा सूर्यप्रकाश शरीरातील झोपेचे हार्मोन संतुलित ठेवतो, त्यामुळे सकाळी थोडा वेळ उन्हात घालवा. झोपण्यापूर्वी वाचन, ध्यान किंवा शांत संगीत ऐकण्याची सवय लावा, जे मेंदूला रिलॅक्स होण्याचा संकेत देतं. दुपारची जास्त झोप टाळा आणि रात्री हलकं जेवण घ्या यामुळे रात्री वेळेवर आणि गाढ झोप लागते.

चांगली झोप ही तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ती सुधारण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही फक्त छोट्या सवयी बदलल्या, तरी मोठा फरक जाणवतो.

Comments are closed.