वरिष्ठांना न कळवता दांडी मारणाऱ्याला कामावरुन काढणे योग्य; मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना न कळवता गैरहजर राहणे आता चांगलेच महागात पडणार आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अर्थात कार्यालयात कोणतीही पूर्वसूचना न देता दीर्घकाळ कामावर गैरहजर राहणे हा गंभीर गैरप्रकार आहे. अशा प्रकरणांत संबंधित कर्मचाऱ्याला शिस्तभंगाची कारवाई म्हणून कामावरुन काढणेच योग्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीतील वरिष्ठ सहाय्यक महिलेची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा मोठा निकाल दिला. न्यायालयाने यासंदर्भात 44 पानी निकालपत्र जाहीर केले आहे.
काळाचौकी-अभ्युदयनगर येथील रहिवासी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ साहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही महिला 22 एप्रिल 2014 पासून सलग गैरहजर होती. या काळात तिने रजेचा कोणताही अर्ज दिला नव्हता किंवा वरिष्ठांना कळवले नव्हते. कंपनीने वेळोवेळी रिमाइंडर पाठवूनदेखील संबंधित कर्मचारी महिला कामावर रुजू झाली नाही. अखेर 993 दिवसांच्या बेकायदा रजेनंतर कंपनीने विभागीय चौकशी बसवली. या चौकशीनंतर 10 जानेवारी 2018 रोजी महिलेला विमा कंपनीच्या सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
कंपनीच्या या निर्णयाविरोधात कर्मचारी महिलेने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने महिलेला दिलासा देण्यास नकार देत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली. जवळपास 3 वर्षे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय गैरहजर राहणे हा निव्वळ निष्काळजीपणा आहे. कर्मचाऱ्याचा असा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट आहे. हा निर्णय दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.
Comments are closed.