अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर क

अजित पवार विमान अपघातावर सुनेत्रा पवार: बारामती विधानसभेची पोटनिवडणूक (Baramati By-election 2026) 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. काल बारामतीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचाराची काल सांगता सभा झाली. या सभेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) देखील उपस्थित होत्या. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान केलं.

अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झाले आहे. काल त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत (Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Accident) शंका व्यक्त केली. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही  मनात शंका आहे. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं, अशी मागणीही सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही मंचावर उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनीही उत्तर दिलं. अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. (Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Accident)

अजितदादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत- सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Baramati By-election 2026)

अजितदादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मात्र त्यांच्या विचाराचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी खचणार नाही. मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, तसेच मी लढेन. अहिल्यादेवींनी जसा कारभार केला, तसाच कारभार करेन, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही माती माझी आहे, त्यामुळे दादांप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. आपण लाखोंचा पोशिंदा गमावला. दादांचं स्वप्न आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव, त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याचा शिवधनुष्य मी उचलून तुमच्यासमोर आले आहे. दादांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाईन, असंही सुनेत्रा पवरांनी सांगितलं.

बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला- (Baramati By election 2026)

बारामतीतील सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. बारामतीत दाखल होताच देवेंद्र फडणवीस सर्वात आधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर गेले. देवेंद्र फडणवीसांनी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल झाले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून अजित पवारांच्या आठणीही जागवल्या. आधी अजित पवारांसंदर्भातील एक व्हिडीओ सभेत दाखवण्यात आला. या व्हिडीओत अजित पवारांची गाजलेली वक्तव्य, दादांच्या कामाची शैली, याचा उल्लेख करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहताना सभेला उपस्थित असलेले नेते आणि बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर सभेत भाषण करताना अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे.  बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

अजितदादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण, VIDEO:

संबंधित बातमी:

Sunetra Pawar : मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; बारामतीच्या मैदानातून सुनेत्रा पवारांचा विश्वास

आणखी वाचा

Comments are closed.