या गोलंदाजाला अजून कोणीच मारू शकलं नाही षटकार; आतापर्यंत टाकल्यात 72 चेंडू!

आयपीएल २०२६ मध्ये ७२ चेंडू टाकून एकही षटकार न खाणे ही एक मोठी उपलब्धी आहे, जी जवळपास अशक्य वाटते. परंतु, सनरायझर्स हैदराबादच्या एका गोलंदाजाने हा टप्पा गाठला असून, सध्या सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​या प्रतिभावान आणि नशीबवान गोलंदाजाचे नाव साकिब हुसेन असे आहे. त्याने १३ एप्रिल रोजी ‘ऑरेंज आर्मी’कडून (SRH) पदार्पण केले होते. या संघाकडून खेळताना त्याने ३ सामन्यांत प्रत्येकी ४ षटकांचा स्पेल टाकला आहे, मात्र एकाही प्रतिस्पर्धी फलंदाजाला त्याचा चेंडू षटकारासाठी सीमापार धाडता आलेला नाही.

​राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला पहिला आयपीएल सामना खेळताना साकिब हुसैनने ४ षटकांत ६ च्या इकॉनॉमी रेटने २४ धावा दिल्या आणि ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यशस्वी जयस्वाल, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर आणि रवी बिश्नोई हे त्याचे बळी ठरले होते.

​साकिब हुसैनने आपला दुसरा सामना ५ वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला. यात ४ षटके टाकून त्याने ८ च्या इकॉनॉमी रेटने ३२ धावा दिल्या आणि शिवम दुबेला बाद केले. सनरायझर्स हैदराबादने हा सामना १० धावांच्या अंतराने जिंकला होता.

​साकिबचा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होता. यावेळी देखील त्याने पूर्ण ४ षटके टाकली, ज्यात ७.२ च्या इकॉनॉमी रेटने २९ धावा दिल्या आणि केएल राहुलसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला बाद केले. एसआरएचने हा सामना ४७ धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला.

​साकिब हुसैनला इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ‘सर्वात मोठा शोध’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. या गोलंदाजाला गेल्या अनेक हंगामात बेंचवर बसावे लागले होते. त्याचे पदार्पण ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून झाले आणि त्याने असा काही प्रभाव पाडला की, मोठमोठे क्रिकेट तज्ज्ञही त्याची कामगिरी पाहून थक्क झाले आहेत.

Comments are closed.