पहलगाम पीडितांना कधीही विसरणार नाही.
प्रथम स्मृतीदिवशी पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गुरुवारी या हल्ल्याचा प्रथम स्मृतीदिन गांभीर्याने पाळण्यात आला. पहलगाम येथे क्रूर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना आम्ही कधीही विसरणार नाही. दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत त्याच्याशी संघर्ष केला जाईल. पहलगाम हल्ल्याच्या या प्रथम स्मृतीदिनी आमचा दहशतवाद संपविण्याचा निर्धार आणि एकात्मतेची भावना अधिकच बळकट होत आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे.
या हल्ल्यात बळी पडलेल्या 26 नागरीकांच्या कुटुंबियांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वना दिली आहे. या कुटुंबियांना जे भोगावे लागले आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. सारा देश त्यांच्या पाठीशी आहे. अत्यंत दु:खद अशा या प्रसंगात या कुटुंबियांनी साहस आणि सहनशक्ती यांचा प्रत्यय आणून दिला आहे. दहशतवादाला गाडून टाकण्यासाठी भारत सदैव सज्ज असेल, अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 22 एप्रिल 2025 या दिवशी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या 25 निरपराध नागरीकांची निर्घृण आणि धर्मांध पद्धतीने हत्या केली होती. त्यानंतर 15 दिवसांमध्ये भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून पाकिस्तानवर हल्ला करुन सूड उगविला होता.
धर्म विचारुन हत्या
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केवळ क्रौर्याचा कळस गाठला होता, असे नव्हे, तर प्रच्छन्न धर्मांधताही दाखविली होती. त्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन वेगळे केले होते आणि हिंदू पुरुषांची गोळ्या घालून हत्या केली होती. कित्येक पर्यटकांची हत्या त्यांच्या पत्नींच्या समोरच करण्यात आली होती. सारा देश त्या घटनेमुळे संतप्त झाला होता आणि भारताने पाकिस्ताचा सूड उगविला पाहिजे, ही सर्व देशभक्त नागरीकांची भावना होती. भारतानेही नंतर पाकिस्तानला धडा शिकविताना त्याची आतोनात हानी केली होती. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या चार पैकी तीन दहशतवाद्यांना नंतर एन्काऊंटरमध्ये कंठस्नान घालण्यात आले होते.
भूसेनेचाही कठोर संदेश
भारताच्या भूसेनादलाकडूनही पहलगाम हल्ल्याचा प्रथम स्मृतीदिन गांभीर्याने पाळण्यात आला. कोणीही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जन्मभर लक्षात राहील, असा धडा शिकविला जाणार आणि बळींना न्याय मिळवून दिला जाणार, हे निश्चित आहे. आपल्या संदेशात भारतीय भूसेनेने ‘महादेव अभियाना’चीही माहिती दिली आहे. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी तिघांना, या अभियानाच्या अंतर्गत 93 दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर कंठस्नान घालण्यात आले होते. मात्र, या हल्ल्याचा सूत्रधार आजही पाकिस्तानात असून त्याला ओळख दडवून वावरावे लागत आहे. संधी मिळताच त्याचाही खात्मा करण्यासाठी भारत सज्ज आहे, हा संदेश भारताने आपल्या कृतीतून दिला आहे.
पुन्हा असा प्रकार केल्यास…
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनीही पहलगाम हल्ल्याच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्ताने पाकिस्तानला टोकदार संदेश दिला आहे. आमचे सर्व शेजारी देश आमच्याशी सद्भावाने वागतात. मात्र एका शेजारी देशाचा अपवाद आहे. या देशाला आम्ही चांगलाच धडा शिकविला आहे. त्याने पुन्हा भारताची कळ काढण्याचा प्रयत्न केला तर….अशा शब्दांमध्ये राजनाथसिंग यांनी पाकिस्तानला गर्भित संदेश दिला असून सांकेतिक पद्धतीने परिणामांची जाणीव करुन दिली आहे. त्यांनी एका व्हिडीओद्वारे हा संदेश प्रसारित केला आहे. भारताने आपल्या सेनादलांचे सामर्थ्य वाढविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शस्त्रनिर्मितीच्या संदर्भातही भारत आत्मनिर्भर होण्यासाठी अग्रेसर आहे, असा संदेश त्यांनी दिला.
‘सिंदूर अभियान’ आणि ‘महादेव अभियान’
सिंदूर मोहीम
ड पाकिस्तानातील दहशतवादी आणि पाकिस्तानचा सूड उगविण्यासाठी भारतीय सेनादलांनी पहलगाम हल्ल्ल्यानंतर त्वरित हाती घेतलेले हे अभियान.
ड 7 मे या दिवशी पहाटे भारताचा पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर प्रचंड आघात. 100 हून अधिक दहशतवादी आणि प्रशिक्षक यांना कंठस्नान
ड पाकिस्तानच्या 13 वायुतळांवर आणि भूसेना तळांवर भारताचा घातक क्षेपणास्त्र हल्ला. अनेक तळ उध्वस्त. पाकिस्तानची विमानेही जागीच नष्ट.
महादेव अभियान
ड या अभियानाच्या अंतर्गत भारताच्या भूसेनेने काश्मीरच्या वन विभागांमध्ये पहलगाम हल्ल्याचा दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हे अभियान हाती घेतले.
ड 93 दिवसांच्या या शोधकार्यात जवळपास 400 चौरस किलोमीटरचा वन प्रदेश धुंडाळण्यात आला. लपलेल्या 3 दहशतवाद्यांना शोधून कंठस्नान घातले गेले.
ड हा हल्ला करण्यासाठी भारतात घुसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना पुन्हा पाकिस्तानात जाणे शक्य होऊ नये, यासाठी नाकेबंदी करुन शोधकार्य केले.
Comments are closed.