पंतप्रधान मोदी युरोप दौऱ्यावर.

नॉर्वे, नेदरलँड, इटलीचा समावेश : 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवर लक्ष

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात युरोपच्या एक आठवड्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश युरोपीय महासंघासोबत व्यापारी आणि रणनीति संबंधांना आणखी मजबूत करणे तसेच खंडासोबत भारताच्या वाढत्या भागीदारीला नवी दिशा देणे आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे नॉर्वे, नेदरलँड आणि इटलीला भेट देणार आहेत.

नॉर्वेचा दौरा : तिसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा एक महत्त्वपूर्ण पल्ला नॉर्वेची राजधानी ओस्लो असेल, जेथे ते तिसऱ्या ‘भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत’ भाग घेतील. या परिषदेत स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि आइसलँडचे नेतेही सामील होणार आहेत. यापूर्वी ही परिषद 2018 साली स्टॉकहोम तर 2022 मध्ये कोपेनहेगन येथे आयोजित झाली आहे. नॉर्वे युरोपीय मुक्त व्यापार महासंघाचा एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये लागू झालेल्या ‘भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारा’नंतर या दौऱ्याचे महत्त्व खूपच वाढले आहे.

भारताला काय मिळणार?

या कराराच्या अंतर्गत ईएफटीए देशांनी पुढील 15 वर्षांमध्ये भारतात 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे देशात सुमारे 10 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच यामुळे वस्त्राsद्योग, चर्मोद्योग आणि खाद्य उत्पादनांच्या क्षेत्रात भारतीय निर्यातदारांसाठी नवी बाजारपेठ खुली होणार आहे. ओस्लोमध्ये होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेत हरित ऊर्जा, हवामान बदल, ब्ल्यू इकोनॉमी, नवोन्मेष, डिजिटलीकरण आणि आर्क्टिक क्षेत्रात सहकार्यावर विस्तारपूर्वक चर्चा होईल.

नेदरलँड दौरा : कृषी अन् तंत्रज्ञानावर लक्ष

ओस्लोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड येथे पोहोचतील. या देशाला मोदींनी यापूर्वी 2017 मध्ये भेट दिली होती. नेदरलँड हा देश जलव्यवस्थापन, कृषी, तंत्रज्ञान आणि दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये भारताचा एक प्रमुख भागीदार राहिला आहे. मागील वर्षी काही कारणांमुळे टाळलेले कार्यक्रम आणि बैठकांच्या तारखांना अंतिम रुप दिले जात आहे, जेणेकरून दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करता येऊ शकेल.

इटली, व्हॅटिकन सिटी : पहिला द्विपक्षीय दौरा

पंतप्रधान मोदींच्या दैरा कार्यक्रमात इटलीही सामील आहे. मोदींचा हा पहिला इटलीचा द्विपक्षीय दौरा असेल. तर 2021मध्ये जी20 शिखर परिषद आणि 2024मध्ये जी7 आउटरीचसाठी त्यांनी रोमचा दौरा केला होता. इटलीच्या पंतप्रधना जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू संरक्षण, ऊर्जा आणि गुंतवणुकीशी निगडित मुद्दे असतील.

पोपशी भेट शक्य

पंतप्रधान मोदी हे व्हॅटिकन सिटीचा दौरा करत ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे.

भारत-युरोपियन फेडरेशन समिट कौन्सिल

मे महिन्यातील हा युरोप दौरा 27 जानेवारी रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या 16 व्या भारत-युरोपीय महासंघ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर होतोय. शिखर परिषदेचे सह-अध्यक्षत्व पंतप्रधान मोदी, युरोपीय परिषदेचे अध्यक्ष एंटोनियो  कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी केले होते. त्यावेळी भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारावर चर्चा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच एक नवी ‘सुरक्षा तसेच संरक्षण भागीदारी’ आणि ‘टुवर्ड्स 2030’ संयुक्त रणनीतिक अजेंडाही निश्चित करण्यात आला होता.

आगामी दौऱ्याचे लक्ष्य

पंतप्रधान मोदींच्या आगामी दौऱ्याचे लक्ष्य मुक्त व्यापार करार वेगाने लागू करणे, पुरवठासाखळीला विविधतापूर्ण करणे आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास मदत मिळविणे आहे.

फ्रान्समध्ये जी7 परिषद

युरोपसोबतच्या  या कूटनीतिच्या क्रमात पंतप्रधान मोदी हे जून महिन्यात फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते जी7 शिखर परिषदेत सामील होणार आहेत. भारताला 2019 पासून सातत्याने या प्रभावशाली समुहाच्या आउटरीच कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले जात राहिले आहे, यातून जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा स्पष्ट होते.

 

Comments are closed.