ममता बॅनर्जींचा लोकशाहीला धोका
आय-पॅक’ संबंधी सर्वोच्च न्यायालयाकडून ताशेरे
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तीन महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘आय-पॅक’ फाईल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टिप्पणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला धोका उत्पन्न केला आहे, असे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बुधवारी निर्भर्त्सना केली. ‘आय-पॅक’ कंपनीवर प्रवर्तन निदेशालयाची (ईडी) धाड पडली असताना ममता बॅनर्जी यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह तेथे जाऊन फाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे हिसकावून घेतले होते. या प्रकरणी सध्या न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्याचे मतदान अगदी तोंडावर आले असताना, सर्वोच्च न्यायालयाने बॅनर्जी यांच्या विरोधात केलेल्या या कठोर टिप्पणीमुळे त्यांची कोंडी होणे शक्य आहे.
कोलकाता येथे जानेवारीत आय-पॅक कंपनीवर ईडीने धाड घातली होती. ही धाड पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळ्यासंदर्भात होती. ईडीची कारवाई होत असताना ममता बॅनर्जी अचानक तेथे पोहचल्या. त्यांच्यासह पश्चिम बंगालचे वरीष्ठ पोलिस अधिकारीही होते. त्यांनी ईडीच्या कार्यात हस्तक्षेप केला आणि काही महत्वाच्या फाईल्स तसेच पेन ड्राईव्ह, सीडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांनी हिसकावले. त्या ते त्यांच्यासमवेत घेऊन गेल्या. त्यामुळे ईडीने त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक महत्वपूर्ण याचिका सादर केलेली आहे.
बॅनर्जी यांचे म्हणणे
केंद्र सरकारने राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी या ईडीच्या धाडी घातल्या होत्या. त्यामुळे आपल्याला हस्तक्षेप करणे भाग पडले, असा युक्तीवाद ममता बॅनर्जी यांच्या वतीने करण्यात आला. तथापि, तो खंडपीठाने मान्य केला नाही. हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधांचा प्रश्न नाही. एका राज्याच्या प्रमुखपदी असलेली व्यक्ती ईडीच्या कामामध्ये अशा प्रकारे हस्तक्षेप करुन कामात अडथळा आणते, ही घटना अत्यंत गंभीर आहे. बॅनर्जी यांच्या या कृतीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. तुम्ही आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सीरवई इत्यादींनी काय लिहून ठेवले आहे, हे ऐकवत आहात. पण या थोर लोकांनीही एका राज्याच्या प्रमुखाकडून असे वर्तन होईल, याची कल्पना केली नसावी, अशी अतिशय बोचरी टिप्पणी खंडपीठाने ममता बॅनर्जी यांच्या उद्देशून केली आहे.
प्रकरण काय आहे…
कोळसा घोटाळा आणि मनी लाँडरींग या प्रकरणांमध्ये ईडीने आय-पॅक कंपनीच्या 10 आस्थापनांवर जानेवारीत एकाच वेळी धाडी घातल्या होता. कोळसा घोटाळा करणाऱ्या टोळीचा सूत्रधारी अनूप माजी आणि आय-पॅक कंपनीचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या चौकशीचा एक भाग म्हणून या धाडी घालण्यात आल्या होत्या. प्रतीक जैन आणि त्यांची कंपनी आय पॅक यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी जवळचे संबंध आहेत. तसेच आय-पॅक ही कंपनी तृणमूल काँग्रेसच्या राजकीय व्यवस्थापनाचे आणि सल्लागाराचे कामही करते. प्रतीक जैन यांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर धाड टाकून ईडीचे अधिकारी तपासणी करत असताना. ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष स्वत: तेथे जाऊन तपासणीत हस्तक्षेप केला. एका खासगी कंपनीची चौकशी होत असताना राज्याच्या प्रमुख नेत्याने अशा प्रकारे वर्तन करावे, हा तेव्हापासून आतापर्यंत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
धाडी नव्हत्या राजकीय
आय-पॅकवरच्या धाडी राजकीय स्वरुपाच्या नव्हत्या. त्या एका गुन्ह्याच्या चौकशीचा भाग म्हणून टाकण्यात आल्या होता. अशा स्थितीत ईडीच्या कारवाईला अडथळा आणण्याचे बेकारदेशीर कृत्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यांच्या ईडीकडून ज्या फाईल्स आणि इतर पुरावा हिसकावलेला आहे, तो ईडीला परत देण्याचा आदेश त्यांना द्यावा, अशी मागणी ईडी याचिकेत करण्यात आली आहे.
राजकीय परिणाम शक्य…
आज गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्याचे मतदान होत आहे. त्याच्या आदल्याच दिवशी ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाची फटकार बसली आहे. या घटनेचा आज गुरुवारी होत असलेल्या मतदानावर परिणाम होणार का, हासुद्धा मोठ्या चर्चेचा विषय आता झाला आहे.
काय म्हणाले न्यायालय…
ड ईडीच्या तपासात ममता बॅनर्जी यांनी हस्तक्षेप करणे अत्यंत धक्कादायक
ड ममता बॅनर्जी यांचे हे वर्तन लोकशाही तत्वांच्या विरोधात आणि आक्षेपार्ह
ड हा केंद्र सरकार-राज्य सरकार यांच्यातील संघर्ष नाही. हा तपासणीचा प्रश्न`
Comments are closed.