बोहाड्यात भीम-बकासुर भिडले; मोखाड्याच्या जगदंबा उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती
आदिवासी भागातील शेकडो वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या खोडाळ्यातील जगदंबा उत्सवाला (बोहाडा) अमाप उत्साहात साजरा झाला. बोहाड्यात गदा, तलवार घेऊन भीम-बकासुर भिडले. उत्सवात भीम-बकासुर युद्धासह रावण, नंदी आणि विंचवाचे सोंग आबालवृद्धांचे विशेष आकर्षण ठरले. जगदंबा भक्त व परिसरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या उत्सवाला गर्दी केली होती.
मोखाड्यात जगदंबा उत्सवाची सुमारे तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. मोखाड्याचा मुख्य आणि मानाचा बोहाडा झाल्यानंतर अन्य गावोगावी हा उत्सव साजरा करण्यात येतो. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळ्यात चार दिवस जगदंबा उत्सवाची धूम होती. २१ एप्रिलला रात्रभर मुख्य उत्सव साजरा झाला. सकाळी वाजतगाजत देवीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी खणा-नारळाने देवीची ओटी भरून पूजा केली. नवस फेडण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
यात्रेच्या पाश्र्वभूमीवर गावात पाळणे, खेळणी, खाऊ, कटलरीची दुकाने आल्याने चांगली उलाढाल झाली. जगदंबा उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश येलमामे, रघुनाथ पवार, प्रल्हाद कदम, प्रफुल्ल खैरनार, डॉ. मिठाराम कडाव, विजय येलमामे, एकनाथ पवार यांसह समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन हा उत्सव निर्विघ्न पार पाडला. यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
काय आहे बोहाडा?
देवदेवतांचे मुखवटे घालून संबळाच्या तालावर, टेंब्याच्या उजेडात ही सोंगे विशिष्ट तालावर नाचवली जातात यालाच बोहाडा म्हणतात. हा उत्सव पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यातूनही भाविक येतात. उत्सवाच्या मुख्य दिवशी भीम-बकासुरचे युद्ध विशेष आकर्षण ठरले होते. त्याचबरोबर नंदी, विंचू आणि रावणाच्या सोंगाने सर्वांचीच वाहवा मिळवली
Comments are closed.