युद्धविरामानंतरही ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ 6 महिने राहणार बंद! अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा अहवाल लीक
अमेरिकेने इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 36 ते 72 तासांत शांतता चर्चा होण्याची शक्यता असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. पण आखाती देशांतील तणाव निवळताना दिसत असला तरी जगाची चिंता अद्याप कायम आहे. अमेरिकन गुप्तचर विभागाचा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’शी संबंधित एक अत्यंत गोपनीय अहवाल लीक झाल्याने जगाची चिंता वाढली आहे.
गुप्तचर विभागाच्या या अहवालानुसार, इराणसोबतचे युद्ध थांबले नाही तर, इराणकडून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ या सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणसुरुंग पेरले जाऊ शकतात. असे झाल्यास हा मार्ग पुन्हा सुरक्षित करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पण गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला हा मार्ग पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी बंद राहणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी आपत्ती ठरू शकते.
‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग मानला जातो. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के व्यापार याच अरुंद मार्गातून होतो. त्यामुळे युद्धपरिस्थितीत इराण हा मार्ग पूर्णपणे रोखून धरू शकतो. पाणसुरुंग पेरणे इराणसाठी सोपे असले तरी ते शोधून नष्ट करणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ आहे. सहा महिने इंधन पुरवठा विस्कळीत झाला तर, जागतिक स्तरावर तेलाच्या किमती गगनाला भिडतील. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबतचे वृत्त सर्वात आधी प्रसिद्ध केले होते. यावर आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटागन) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हा अहवाल समोर आल्यानंतर पेंटागनने तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली. पेंटागनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ही ‘बेजबाबदार पत्रकारिता’ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, ही माहिती चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे. “गुप्तचर विभागाचा अंदाज म्हणजे वास्तव नव्हे,” असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेकडे कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्याची पूर्ण क्षमता आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, सहा महिने हा मार्ग बंद राहणे अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे त्यांनी बजावले.
Comments are closed.