Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा; देवरुख, साखरपा परिसराला झोडपले, आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यात आज दुपारी अचानक हवामान बदलले आणि देवरुख, साखरपा, शिवने आणि बुरंबी परिसरासह तालुक्याच्या बहुसंख्य भागाला वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यांनंतर आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर कोसळलेल्या या मुसळधार पावसात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी जुनाट झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कोकणच्या आर्थिक कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकाला बसला आहे. सध्या काजूचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाच या वादळामुळे झाडावर असलेला काजू आणि बोंडू यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. पावसामुळे ओला झालेला काजू खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

तसेच, हापूस आंब्यावरही या वातावरणाचे विपरीत परिणाम होणार आहेत. वाऱ्यामुळे आंब्याच्या झाड्यावरील कैरी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे फळांवर कीड पडण्याची किंवा डाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ बागायतीच नव्हे तर, ग्रामीण भागातील उत्पन्नाचे साधन असलेला ‘रानमेवा’ म्हणजेच करवंदे, जांभळे आणि तोरणे यांनाही या वादळी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे ऐन हंगामात रानमेवा अडचणीत आला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments are closed.