अरजितसिंह चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी साईलाला वाराणसी पोलिसांना शरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेडमधील ई स्क्वेअर परिसरात ४ एप्रिल रोजी पहाटे अरजितसिंह चव्हाण यांच्यासह अन्य एकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील मुख्य आरोपी साईलाला हा वाराणसी पोलिसांना शरण आला असून, स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्याचे हस्तांतरण वॉरंट घेऊन त्याला नांदेडमध्ये आणण्यात येणार आहे.

नांदेड शहर हादरुन टाकणार्‍या ४ एप्रिलच्या घटनेत जागेवर दोघांचा तर एकाचा शासकीय रुग्णालय परिसरात खुन झाला होता. सुरुवातीला अरजितसिंह चव्हाण याचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन ई स्क्वेअर परिसरात खुन करण्यात आला. या प्रकरणातील इस्टाग्राम फेम आरोपी शेख शाहरुख आणि शेख उबेद या दोघांना तीन दिवसापूर्वी नांदेड पोलिसांनी अटक केली होती. त्यांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी साई उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार (सिडको) हा मात्र फरार झाला. त्याला लवकरच अटक करु असे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पोलीस त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने शोध घेत असतानाच काल रात्री तो वाराणसी पोलिसांना शरण आला. त्याच्या चौकशीतून वेगवेगळे मुद्दे तपासात उघडकीस येणार आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिलेल्या माहितीनुसार साईलाला यास हस्तांतरण वॉरंट घेऊन नांदेड पोलिसांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, यासाठी विशेष पथक नांदेडहून रवाना झाल्याचे सांगण्यात आले. अरजितसिंह चव्हाण यांच्या घरातील नातेवाईक व संबंधित व्यक्तीनाही नांदेड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येचे नेमके कारण काय? काही आर्थिक व्यवहार होते ? गँगवार टोळीचा यामागे सबंध आहे का? किंवा वैयक्तीक द्वेषातून अरजितसिंह चव्हाण याचा खुन करण्यात आला का? याची चौकशी शेख शाहरुख, शेख उबेद व चव्हाण याच्या नातेवाईकाकडून होत आहे.

दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार साईलाला हा पोलिसांना शरण आला नाही. तर आमच्या पथकाने विशेष परिश्रम घेवून त्यास पकडल्याचे सांगितले. त्यांचे हस्तांतरण घेऊन नांदेडला आणण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Comments are closed.