ज्या घरात आश्रय घेतला, तिथेच इस्रायली स्ट्राईक; महिला पत्रकार अमल खलील यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात लेबनानी पत्रकार अमल खलील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अल-तिरी गावात ही घटना घडली असून, ज्या घरात त्यांनी आश्रय घेतला होता, त्याच घरावर इस्रायलने क्षेपणास्त्र डागले. या वर्षात लेबनॉनमध्ये आतापर्यंत ९ पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, अमल खलील या दक्षिण लेबनॉनमधून रिपोर्टिंग करत होत्या. त्या ज्या कारमधून जात होत्या, त्या कारजवळ आधी हवाई हल्ला झाला होता. ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी अमल खलील आणि त्यांची सहकारी जीनाब फराज यांनी एका घरात आश्रय घेतला. मात्र काही वेळातच त्या घरावरही हल्ला झाला. या हल्ल्यात घर कोसळून अमल खलील ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या.

हल्ल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र इस्रायली गोळीबार आणि बॉम्बफेकीमुळे बचाव कार्यात अडथळे आले. अखेर लेबनानी सैन्य, नागरी संरक्षण दल आणि रेड क्रॉसच्या मदतीने ६ तासांच्या प्रयत्नांनंतर अमल खलील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. खलील या २००६ पासून अल-अखबार वृत्तपत्रासाठी काम करत होत्या.

लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, याला वॉर क्राईम म्हटले आहे. पत्रकारांची हत्या हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे माहिती मंत्री पॉल मोरकोस यांनी सांगितले. दुसरीकडे इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, त्या भागात सीझफायरचे उल्लंघन झाले होते आणि त्यांचा उद्देश पत्रकारांना लक्ष्य करणे नव्हता.

Comments are closed.