अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे, साहित्यिक घेणार वर्ग

महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब सेवांमधील अमराठी चालकांना आता प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मराठी साहित्यिक पुढे सरसावले असून ते अमराठी चालकांना मराठीचे धडे देणार आहेत. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फत अमराठी चालकांसाठी खास मराठी भाषेचे वर्ग आयोजित केले जाणार आहेत.

रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर व ई-बाईक टॅक्सी सेवांमधील अमराठी व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘महाराष्ट्र दिना’पासून निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवारी बोलावली होती. या बैठकीत मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेने अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाला मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर, मनीषा राजपूत आदी साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे.

राज्यभर परवाना तपासणी मोहीम

‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेत इतर नियमांसोबत चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. ‘मराठी सक्ती’चा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात येणार आहे.

‘कोमसाप’च्या 72 शाखांमध्ये शिकवणी

अमराठी चालकांना  जुजबी व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या 72 शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाने हजारो स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून  शुल्क आकारले जाणार नाही.

Comments are closed.