शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा पुस्तक ‘दीन’; ‘शिवाजी कोण होता’च्या प्रकाशकाला उघड धमकी… तुझा ‘पानसरे’ करू!
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशीच संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला, ‘फोनवरून पानसरेंचं काय झालं माहीत आहे ना? घरात घुसून मारीन’ असे धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी प्रकाशक प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत आमदार गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरून दम भरला. ते एवढय़ावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. तुला घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ कापेन, असे धमकावले. या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहात – मेघा पानसरे
गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही, अशा शब्दांत कॉ. पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या वर्तणुकीचा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत, असा सवाल करत मेघा पानसरे यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
पुस्तकाच्या नावावर न जाता त्यात काय लिहिलं ते पाहा – रोहित पवार
आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल तर त्यांना शिवाजी महाराज कळालेच नाहीत. पुस्तकाच्या नावावर न जाता त्यात काय लिहिलं आहे ते पाहावे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा – हर्षवर्धन सपकाळ
राज्य सरकारने आंबी यांना तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचादेखील सहभाग आहे का याची चौकशीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नाही. गायकवाड यांनी आधी पुस्तक वाचावे. -प्रशांत आंबी, प्रकाशक
ऑडिओ क्लिपमध्ये काय?
आमदार संजय गायकवाड यांनी आंबी यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली, याचा कथित ऑडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण, असे म्हणत गायकवाड आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी देत आहेत. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असेही त्यांनी दरडावले. गायकवाड आंबी यांना, तू ब्राम्हण आहेस का? असेही विचारत आहेत.
Comments are closed.