कभी इंडिया आके देखो…, इराणकडून महाराष्ट्राचा व्हिडिओ शेअर; हिंदुस्थानला नरक म्हणणाऱ्या ट्रम्पना फटकारले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे हिंदुस्थानाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिंदुस्थानला “नरक” असे संबोधण्यात आल्याने राजकीय, राजनैतिक आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या पोस्टवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. मंत्रालयाने हे वक्तव्य “अनुचित आणि चुकीच्या मानसिकतेचे प्रतीक” असल्याचे म्हटले. हिंदुस्थानच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या अशा विधानांचा निषेध करण्यात आला आहे.

मुंबईस्थित इराणच्या उच्चायुक्तालयानेही या वादग्रस्त पोस्टवर कठोर भूमिका घेतली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत ट्रम्प यांच्यावर थेट टीका केली. “ट्रम्प यांनी सांस्कृतिक द्वेषातून बाहेर येण्याची गरज आहे. त्यांनी एकदा हिंदुस्थानात येऊन येथील समृद्ध संस्कृती अनुभवावी, त्यानंतरच मत व्यक्त करावे,” असा उपरोधिक सल्ला देत इराणनेही या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडूनही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी हिंदुस्थानला “महान देश” म्हटले असून येथे त्यांच्या “अत्यंत चांगल्या मित्रांचा” उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा गैरसमज झाला असल्याचे सांगण्यात आले.

ट्रम्प यांनी जी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ती पोस्ट ही ट्रम्प यांची मूळ टिप्पणी नाही तर, लेखक आणि रेडिओ होस्ट मायकल सॅवेज यांच्या विधानाचा री-पोस्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे. सॅव्हेज यांनी अमेरिकेतील स्थलांतरितांविषयी बोलताना हिंदुस्थान, चीन आणि इतर देशांबाबत आक्षेपार्ह भाष्य केले होते. “अमेरिकेत जन्मलेले मूल नागरिकत्व मिळवताच संपूर्ण कुटुंबाला हिंदुस्थान, चीन किंवा इतर ‘नरक’ समजल्या जाणाऱ्या देशांतून आणले जाते,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. तसेच स्थलांतरितांमुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात येत असल्याचाही दावा त्यांनी केला.

Comments are closed.