Coffee With Karan -‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन लवकरच येणार
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’चे आतापर्यंत आठ सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, आता या शोचा नववा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. करणने स्वतः एका मुलाखतीत ही अधिकृत घोषणा केली असून, या बातमीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत करणने स्पष्ट केले की, ‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन यावर्षी दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे. 2004 मध्ये सुरू झालेला हा शो बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. गेल्या सीझनमध्ये दीपिका पदुकोणने तिच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बराच गदारोळ झाला होता, मात्र तरीही या शोची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या चॅट शोच्या नव्या सीझनसोबतच करणने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्याचा गाजलेला चित्रपट ‘कभी अलविदा ना कहना’ आता वेब सीरिजच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. विवाहबाह्य संबंधांवर आधारित या चित्रपटाने त्यावेळी समाजात मोठी खळबळ उडवून दिली होती.
Comments are closed.