मुद्रा – पर्यावरणाशी अतूट नाते

>> पराग पोतदार

देशसेवेनंतर पर्यावरण रक्षणासाठी झटत माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी ओसाड टेकड्यांना हिरवेगार करीत जलसंवर्धनाचा आगळा प्रयोग साकारला, त्यांचे हे ध्येयच पर्यावरणाशी असलेले अतूट नाते दृढ करणारे आहे.

लष्करी निवृत्त सैनिक ते निसर्गप्रेमी योद्धा, रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंब एका वेळी एक खंदक खोदून ओसाड टेकडय़ांना पुनरुज्जीवित करत आहेत. देशसेवेनंतर आता पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या माजी सैनिकाने उल्लेखनीय कार्य करून दाखवले आहे. माजी हवालदार रमेश खरमाळे यांनी केवळ दोन महिन्यांत 70 चर खोदून तब्बल 8 लाख लिटर पावसाचे पाणी साठवण्याचा पराक्रम केला आहे.

2012 साली सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर रमेश खरमाळे यांनी 2013 पासून पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू केले. सैन्यात 17 वर्षे सेवा दिल्यानंतर आईच्या उपचारांसाठी त्यांना निवृत्ती घ्यावी लागली. मात्र, घरी परतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी केला. जुन्नर परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करताना त्यांना झाडांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी वृक्षारोपणाला सुरुवात केली आणि पुढे वनविभागात वनरक्षक म्हणूनही काम पाहिले. मात्र, झाडांच्या संगोपनासाठी पाण्याची मोठी अडचण जाणवत होती.

या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी पावसाचे पाणी साठवण्याचा मार्ग निवडला. 2021 साली रमेश खरमाळे आणि त्यांच्या कुटुंबाने सलग 60 दिवस मेहनत घेऊन जुन्नर तालुक्यातील धामणखेल गावाजवळील डोंगरावर 70 चर खोदले. या उपायामुळे आज धामणखेल गावातील विहिरींमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध राहते. तसेच परिसरातील झाडेही हिरवीगार आणि टवटवीत राहू लागली आहेत. सध्या ते या ठिकाणी `ऑक्सिजन पार्क’ उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न करत आहेत.

धामणखेलपासून तीन किमी अंतरावर असलेल्या वडाज गावातील दीड एकर जागेत लवकरच `ऑक्सिजन पार्क’ साकार होणार आहे. याबाबत ते सांगतात, `मागील वर्षी पिंपळ, गवार, महोगनी, कडुलिंब आणि बांबू यांसारख्या जंगली जातींची लागवड सुरू केली . या सर्वांची वये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक आहेत. आतापर्यंत आम्ही त्यापैकी 175 झाडे लावली असून आणखी 50 झाडांची भर घातली आहे. आम्ही चार तलावही बांधले आहेत.’ एकेकाळी कोणतीही वनस्पती नसलेल्या या ठिकाणी आता शेकडो पक्षी आकर्षित होत असून काही वर्षांत शेजारच्या गावांमध्येही ते ही योजना राबवणार आहेत.

`संवर्धन ही माझी आवड आहे, पण ते माझे कर्तव्यही आहे,’ असे खरमाळे म्हणतात. बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातील अल्प कारकिर्दीनंतर, 2021 मध्ये त्यांना त्यांचे खरे ध्येय सापडले. लष्करी सेवेने त्यांच्यात शिस्त रुजवली, जी आता भूमीला पुनरुज्जीवित करण्याकडे वळली आहे. वाढदिवसाच्या दिवशी हा प्रकल्प हाती घेत त्यांनी दोन महिन्यांत 300 तास अथक परिश्रम करून डोंगराच्या कड्यावर 70 चर खोदले.

धामणखेल येथील खंडोबा मंदिराच्या शिखरावर पाणीटंचाईशी लढण्यासाठी एकट्याने सुरू केलेली मोहीम आता विस्तारली आहे. त्यांनी कुटुंबासह 450 हून अधिक झाडे लावली असून, खंदक खोदलेल्या उतारांवर आणखी 500 झाडे लावण्याची योजना आहे. एकूण 412 मीटर लांबीचे हे नागमोडी चर, दर हंगामात अंदाजे 8 लाख लिटर पावसाचे पाणी साठवू शकतात, ज्यामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. `पुरेशा पावसामुळे, ही प्रणाली दरवर्षी 16 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी पुनर्भरण करू शकते’, असे खरमाळे  नमूद करतात.

त्यांच्या या कार्यातून “Once a Soldier Always Soldier ” या उक्तीचा प्रत्यय येत आहे.

आपल्या लोकप्रिय `निसर्गरम्य जुन्नर’ फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम खात्यांसह, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरमाळे यांनी जुन्नरमधील 12 ऐतिहासिक भुयारी मार्गांवर प्रकाश टाकला आहे, विविध गावांमध्ये असलेल्या गजलक्ष्मीच्या 16 प्राचीन दगडी मूर्ती आणि प्राचीन शिला कोरीव कामे जगासमोर आणली आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जुन्नरमधील  विस्मृतीत गेलेल्या सात शिला-कोरीव शिल्पांचा पुनर्शोध लावला आहे.

Comments are closed.