नाव बदलणाऱ्या सलीम वस्तिकला अटक.

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एक्केचाळीस वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केलेला खुनी सलीम वास्तिक याला अटक करण्यात आली आहे. त्याला या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तथापि, 25 वर्षांपूर्वी त्याची जामीनावर काही काळासाठी मुक्तता करण्यात आली असताना तो पळून गेला होता. त्यानंतर 25 वर्षे तो नाव बदलून वावरत होता. त्याचे मूळ नाव सलीम खान असे आहे. तो प्रथम सलीम अहमद आणि नंतर सलीम वास्तिक या नावांनी वावरला. काही वर्षांपूर्वी त्याने स्वत:च्या युट्यूब चॅनेलचाही प्रारंभ केला होता. जामीनाच्या अटी धुडकावून पळून गेल्याच्या काळात त्याने अनेक छोटे धंदे करुन पोट भरले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला आणखी एका आरोपीसह 1997 मध्ये जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ही शिक्षा 2011 मध्ये उच्च न्यायालयाने संमत केली होती. पण 2000 मध्येच तो तात्पुरत्या जामीनावर बाहेर पडून नंतर परागंदा झाला होता. या काळात त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. तथापि, यश येत नव्हते त्याने युट्यूब चॅनेलचा प्रारंभ केल्यानंतर तो प्रकाशात आला. त्यामुळे त्याला पडकण्यात यश आले, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

Comments are closed.