दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला – TMarathiNews
झुरिचला जाणाऱ्या ‘स्विस एअर’ विमानाचे इंजिन टेकऑफवेळी निकामी : आगीमुळे ‘आणीबाणी’ : सुदैवाने 232 प्रवासी बचावले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) रविवारी एक मोठा अपघात टळला. स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणाऱ्या विमानाच्या एका इंजिनला अचानक आग लागल्याने, टेकऑफच्या अगदी आधी धावपट्टीवरच टेकऑफ रद्द करण्यात आले. धावपट्टीवरील आपत्कालीन स्लाईड्सचा वापर करून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सहा प्रवासी जखमी झाले. पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी घबराट पसरली. सुदैवाने वैमानिकांचे प्रसंगावधान आणि आपत्कालीन पथकांच्या तत्परतेमुळे 232 लोकांचे प्राण वाचले.
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळण्याची घटना रविवारी पहाटे सुमारे 1:08 वाजता घडली. स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान एलएक्स147 (एअरबस ए330) दिल्लीहून झुरिचला जात असताना रनवे 28 वर होते. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार24 नुसार, विमानाने 104 नॉट्स (सुमारे 192 किमी/तास) वेग गाठला असतानाच नंबर 1 इंजिन अचानक बंद पडल्यामुळे धूर येऊ लागला. पायलटने तात्काळ टेकऑफ रद्द करत विमान रनवेवर सुरक्षितपणे रोखले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या एका भागातून धूर निघताना दिसत होता. तसेच लँडिंग गिअरजवळही आगीच्या खुणा दिसत होत्या. यानंतर, विमानतळावर तात्काळ संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली.
रनवेवर ‘इमर्जन्सी’ जाहीर
आग लागल्याची खात्री होताच, विमानतळ प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली. बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रनवे 28 तात्काळ बंद करण्यात आला. अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आणि संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला.
232 प्रवाशांना सुरक्षितपणे वाचविले
या घटनेवेळी विमानात चार लहान मुलांसह एकूण 232 प्रवासी होते. आग लागल्यानंतर तात्काळ आपत्कालीन स्थलांतर सुरू करण्यात आले. आपत्कालीन स्लाईड्सचा वापर करून प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आले. जे प्रवासी स्लाईड्स वापरू शकले नाहीत, त्यांना जिन्यांच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यादरम्यान सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. विमानातील सर्व कर्मचारीही सुरक्षित आहेत.
एअरलाईन्सकडून निवेदन
टेकऑफच्यावेळी लँडिंग गिअरमध्ये धूर दिसल्याचे स्विस एअरलाइन्सने म्हटले आहे. आम्हाला दिल्लीतील फ्लाइट एलएक्स147 च्या घटनेची माहिती मिळाली आहे. ज्या विमानात बिघाड झाला ते एअरबस ए330 आहे. ही घटना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1:00 नंतर घडली. विमान टेकऑफसाठी धावपट्टीजवळ येत असताना डाव्या लँडिंग गिअरमधून धूर येत असल्याचे दिसले. यादरम्यान फ्लाइट तात्काळ थांबवण्यात आल्याचे एअरलाइनने निवेदनात सांगितले.
दिल्ली विमानतळावर 10 दिवसात दुसरी घटना
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 10 दिवसांत झालेला हा दुसरा मोठा विमान अपघात आहे. 16 एप्रिल रोजी स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांची टक्कर झाली होती. अकासाचे विमान टेकऑफसाठी सज्ज असताना लेहहून येणाऱ्या स्पाईसजेटच्या फ्लाइटची त्याला धडक बसली. या अपघातात स्पाईसजेटच्या उजव्या पंखाचा एक भाग अकासाच्या डाव्या शेपटीच्या पंखात घुसला होता. घटनेनंतर, विमानतळ कर्मचाऱ्यांनी दोन्ही विमानांतील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नसला तरी अपघाताची नोंद झाली होती.
Comments are closed.