लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी 30 एप्रिल अखेरची मुदत; राज्यातील 26 लाख महिला अपात्र ठरणार?

लाडकी बहिन योजना : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ऑनलाइन ग्राहक ओळख (ई-केवायसी) प्रक्रियेसाठी आता केवळ चार दिवस उरले असून, 30 एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे. महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही राज्यातील सुमारे 26 लाख 34 हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे हे लाभार्थी अपात्र ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात एकूण 2 कोटी 47 लाख लाभार्थी आहेत. मात्र, कागदपत्रांच्या कमतरतेमुळे 26 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी रखडली आहे. 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे. सध्याची उष्णतेची लाट आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने ही शेवटची संधी दिली आहे. या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात.

Ladki Bahin Yojana: 165 कोटींची वसुली आणि गैरप्रकारांवर कारवाई

योजनेच्या पडताळणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुमारे 12,415 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून त्यांनी घेतलेली रक्कम सरकार वसूल करणार आहे. तसेच, पुरुषांनी लाभ घेतल्याचे प्रकार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्यांकडून जवळपास 165 कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर, ज्या महिला केवळ तांत्रिक कारणास्तव किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अपात्र ठरतील, त्यांच्याकडून आतापर्यंत दिलेली रक्कम सरकार वसूल करणार नाही, असा दिलासादायक निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, 30 एप्रिलनंतर योजनेची सद्यस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल आणि अपात्र महिलांचा लाभ थांबवला जाईल.

Ladki Bahin Yojana: बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसूली

दरम्यान, राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही अनेकांनी चुकीची माहिती देत पैसे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, काही पुरुषांनी स्वतःला महिला दाखवत योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यभरात एकूण 12,757 पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ बनून सुमारे 22.96 कोटी रुपयांचा गैरफायदा घेतला आहे. दुसरीकडे, बोगस महिला लाभार्थ्यांपैकी 6,457 जणींकडून सुमारे 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना यासंदर्भात पत्र पाठवून कारवाई सुरू केली होती. मात्र, ही वसुली केवळ 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा

Right To Recall: भाजपमध्ये गेलेल्या खासदारांना आम आदमी पार्टी परत आणू शकते का? काय आहे ‘राइट टू रिकॉल’? जाणून घ्या A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.