आपले मेले तरी चालतील, पण बाहेरचे जगले पाहिजे! प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्पची चिंता करणाऱ्या मोदींवर संजय राऊत बरसले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीमध्ये शनिवारी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारातून डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी सुदैवाने बचावल्या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. आपले मेले तरी चालतील, पण बाहेरचे जगले पाहिजे अशी मोदींची भूमिका असल्याची टीका राऊत सोमवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.

संजय राऊत म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होतो आणि आपल्या पंतप्रधानांना याची चिंता सतावते. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही असे म्हणत ट्रम्प बचावल्याने मोदींना बरे वाटले. परंतु इराणमध्ये अयातुल्लाह खामेनी यांची हत्या झाली त्याबाबत मोदींना चिंता वाटत नाही. सर्वात गंभीर म्हणजे मणिपूरमध्ये लोक मारले जात असून त्याचीही त्यांना चिंता नाही.

गाझामध्ये हजारो मुलं मारले गेली, त्यावरही मोदींनी चिंता, शोक व्यक्त केला नाही. तेहरानमध्ये एका शाळेवर इस्रायल-अमेरिकेने बॉम्ब टाकला आणि 200 लहान मुली मारल्य. त्याबाबतही मोदींना दु:ख झाले नाही. पण हिंदुस्थानला गुलाम बनवणाऱ्या, हिंदुस्थानचा शत्रू पाकिस्तानला ताकद देणाऱ्या ट्रम्पवर हल्ल्याचा प्रयत्न होतो तेव्हा मोदींना दु:ख होते. याचाच अर्थ आपले मेले तरी चालतील, पण बाहेरचे जगले पाहिजे, अशी मोदींची भूमिका असल्याची टीका राऊत यांनी केली.

शांतता चर्चेसाठी इराणला अटी मान्य कराव्या लागतील असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. शांततेची सर्वात जास्त गरज अमेरिकेला आहे. व्हाईट हाऊसच्या डिनेर पार्टीमध्ये गोळीबार झाला याचा अर्थ अमेरिकेमध्ये सर्वकाही ठीक नाही. तिथे अस्थिरता, अशांतता आहे. जे लोक रस्त्यावर उतरले आहेत, हातात बंदुका घेऊन डिनर पार्टीत घुसले आहेत त्यांच्याशी ट्रम्प यांनी आधी शांतता चर्चा करावी आणि जगाची चिंता करावी, असा टोला राऊत यांनी लगावला.

अमेरिका हादरली… वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये बंदूकधारी घुसला! ‘व्हाईट हाऊस’च्या डिनर पार्टीत बेछूट गोळीबार; ट्रम्प बचावले

Comments are closed.