आंजर्ले येथे वाळू साठ्यावर कारवाईदरम्यान वाद, ग्रामस्थांकडून दादागिरी
दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे अवैध वाळू साठ्याबाबत कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकासमोर काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू असून, घटनेबाबत विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
आंजर्ले येथील भंडारवाडा परिसरात गेल्या काही काळापासून वाळू उपशाबाबत तक्रारी येत होत्या. यानंतर महसूल विभागाने दखल घेत मंडल अधिकारी संदीप देवघरकर, तलाठी कृष्णा परिहार (मांदिवली) आणि तलाठी मनोहर रावले (आतगाव) यांना घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पाठवले. तपासणीदरम्यान तेथे वाळूचा साठा आढळून आला.
पथकाने पंचनामा सुरू केल्यानंतर काही ग्रामस्थ घटनास्थळी जमले. यावेळी अधिकाऱ्यांशी काहींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या महिलांनी देखील या अधिकाऱ्यांसमोर दादागिरी करत त्यांना अपशब्द वापरल्याचे मंडल अधिकारी संदीप देवघरकर यांनी सांगितले. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती; मात्र अधिकाऱ्यांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तेथून माघार घेतली.
या घटनेनंतर आंजर्ले परिसरातील वाळू उपसा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अवैध उपसा थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणी प्रशासनाने योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
Comments are closed.