बंगालमध्ये प्रचारादरम्यान काही ठिकाणी तणाव
दगडफेक, बॉम्बहल्ला आणि गोळीबार : पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी हिंसाचार उसळला
वृत्तसंस्था/ कोलकाता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारच्या जाहीर सभेच्या काही तास आधी, रविवारी रात्री पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिह्यात मोठा हिंसाचार उसळला. मिळालेल्या माहितीनुसार, जगद्दल पोलीस ठाण्यासमोर तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. याप्रसंगी दगडफेक, बॉम्बहल्ला आणि गोळीबार झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी लावलेले झेंडे आणि पोस्टर्स फाडल्याने या वादाला सुरुवात झाली. टीएमसी समर्थकांनी जगद्दल परिसरात त्यांच्या प्रचाराच्या साहित्याचे नुकसान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमल्यानंतर जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. गोळीबारात एका सीआयएसएफ जवानाच्या डाव्या पायाला गोळी लागली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
बॉम्बस्फोटामुळे घबराट
दरम्यान, भटपारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि आमदार पवन सिंह यांच्या घरावर बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली. तसेच मालमत्तेचे नुकसान झाले. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.