डाॅन 3 हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा, फरहान अख्तरने चित्रपटाच्या वादावर सोडले मौन
फरहान अख्तरचा बहुप्रतिक्षित “डॉन ३” अजूनही वादात अडकलेला आहे. रणवीर सिंगने चित्रपट सोडल्यामुळे आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे चित्रपटाचे भवितव्य धोक्यात आले आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ कास्टिंगवरून वादात सापडला आहे. सुरुवातीला रणवीर सिंगचा चित्रपटासाठी विचार करण्यात आला होता आणि नंतर त्याला या प्रोजेक्टमधून वगळण्यात आले, त्यानंतर आता फरहानच्या प्रोडक्शन हाऊसने रणवीरकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
आता, फरहान अख्तरने “डॉन ३” बद्दल आपले मत व्यक्त केले आहे. फरहान म्हणाला, हे प्रकरण प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियापर्यंत पोहोचले आहे. मात्र तरीही या चित्रपटाचे काम मात्र बंद झालेले नाही. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी झालेल्या संभाषणात फरहान अख्तरने कबूल केले की, गेली काही वर्षे विशेषतः आव्हानात्मक होती. तो म्हणाला की, आता तो अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करायला शिकला आहे. जोपर्यंत चित्रपट बनत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट निश्चित मानली जाऊ शकत नाही. ‘डॉन ३’ चित्रपटाला एक महत्त्वाचा चित्रपट संबोधताना फरहान म्हणाला की, हा चित्रपट बंद पडणार नाही. माझ्यासाठी सर्जनशीलतेच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा चित्रपट आहे.
२०२३ मध्ये, फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली. घोषणा करतानाच शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग मुख्य अभिनेता म्हणून दिसणार होता. फरहानने रणवीरच्या निवडीला एका नव्या युगाची सुरुवात म्हटले होते. पण जेव्हा रणवीर सिंगने हा प्रकल्प सोडला, तेव्हा हा वाद खऱ्या अर्थाने सुरू झाला. फरहान अख्तरच्या प्रोडक्शन बॅनर, एक्सेल एंटरटेनमेंटने, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाकडे संपर्क साधला असून, रणवीर शेवटच्या क्षणी चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे अंदाजे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. निर्मात्यांनी रणवीरकडून नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंगने दावा केला आहे की तो पटकथेवर असमाधानी असल्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला. नंतर त्याने असा आरोप केला की फरहान अख्तरला चित्रपटात हृतिक रोशन हवा होता, पण ‘धुरंधर’च्या यशाने त्यांचे मत बदलले. तथापि, हृतिक रोशनने हे दावे फेटाळून लावले आहेत. तो म्हणतो की ‘डॉन ३’ साठी त्याच्याशी कधीही संपर्क साधला गेला नाही.
फरहान अख्तरने २००६ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या १९७८ सालच्या ‘डॉन’ या कल्ट-क्लासिक चित्रपटाचा रिमेक बनवला. यात शाहरुख खानने ‘डॉन’ची मुख्य भूमिका साकारली होती. पाच वर्षांनंतर, २०११ मध्ये, फरहानने ‘डॉन’चा सिक्वेल, ‘डॉन २’ आणला, ज्यात पुन्हा एकदा शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये प्रियांका चोप्राने त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शनही फरहान अख्तरनेच केले होते. सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असूनही, प्रेक्षक ‘डॉन ३’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुख्य बाब म्हणजे हा चित्रपट बनलाच तर, ‘डॉन’ची भूमिका कोण साकारणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Comments are closed.