पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा दहशतवाद, संजय राऊत यांचा घणाघात

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या देशभरातून अडिच लाखाहून अधिक निमलष्करी दलाचे जवान तसेच अनेक राज्यांमधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट बोलवले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

”कोणत्याही निवडणूकीत कोणताही राजकीय पक्ष जो केंद्रात सत्तेत आहे तो जर ताकद लावत असेल त्यात काही चुकीचे नाही. पण भाजप जे करतेय ती ताकद नाही. पश्चिम बंगाल सारख्या राज्यात ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना त्यांच्या पराभवासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स पश्चिम बंगालला मोदी शहांनी नेऊन ठेवल्या. प्रत्येक राज्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्टला पश्चिम बंगालला आणले आहे. पश्चिम बंगालमध्ये साम दाम दंड भेदाचा वापर तर होतच आहे पण या पेक्षा Administrative Terrorism, निवडणूक आयोगाचा दहशतवादही सुरू आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. हा अराजकतेचा मार्ग आहे. देशाच्या लोकशाहीत ही अत्यंत गंभीर गोष्ट घडतेय. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतेय. एन्काऊंटर स्पेशलिस्ट नेऊन निवडणूका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदींसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी? नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. अंतराळात राजकारण सुरू झालं तर ते तिथलेही नेते होतील. तरिही त्यांना राज्यातील टेरर पोलीस नेऊन निवडणूक लढवण्याची वेळ येतेय याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतोय”, असे संजय राऊत म्हणाले.

”ज्या पद्धतीने दहशतवादाचा वापर करून लोकांवर दबाव आणून आमिषं दाखवून माणसांना बाजूला केलं जातंय. ही पक्ष फूट नाही तर हा डरपोकपणा आहे. बच्चू कडूंवर कोणता दबाव आहे ते मला माहित नाही. बच्चू कडू हे अत्यंत प्रामाणिक, शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी लढणारा नेता असं आम्ही मानतो. एका आमदारकीसाठी जर कुणी आपला पक्ष विलीन करत असेल तर त्यावर बोलूच आम्ही”, असे संजय राऊत म्हणाले.

”श्रेय वाद हा आघाडी युती कोणत्याही सरकारमध्ये कायम असतो. फक्त केंद्र सरकारमध्ये सगळं श्रेय मोदींना जातं. नितीन गडकरींनी कितीही काम केलं, कितीही रस्ते बांधले, कितीही पूल बांधले तरी त्याचे श्रेय नेहमी मोदींनाच जातो”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

”पानसरे यांच्या पुस्तकावरून ज्यांनी वाद निर्माण केलाय ती फार लहान माणसं आहेत. 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. तेव्हा कधी वाद झाला नाही. वाद करणाऱ्यांनी ते पुस्तक कधी वाचलंय का? छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि त्या दैवताला धक्का लागेल त्या दैवताला धक्का लागेल असा असं काही पानसरेंनी काही लिहलंय असं मला कधी वाटलं नाही. अशा प्रकारे बंदी घालून वेगळ्याच अपप्रवृत्तींना पाठबळ देताय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याला, देशाला, विश्वाला एक दिशा दिली आहे. आजही योद्धा म्हणून महाराज हे विश्वासाठी आदर्श आहेत. अशा वेळी कुणीतरी एक पुस्तक लिहलं आणि कुणीतरी बंदी घालण्याची मागणी केली म्हणून छत्रपतींचं मोठेपण कमी होत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

”या देशात न्यायव्यवस्था कुठे शिल्लक आहे. गेल्या चार वर्षापासून शिवसेना न्यायासाठी लढत आहेत. ज्या प्रकारे 10 व्या शेड्युलला संपवून टाकले आहे त्याला तुम्ही न्याय म्हणाल. या देशात न्याय फक्त भाजप व काही उद्योगपतींना मिळतोय. त्यासाठी फक्त न्यायव्यवस्था सुरू आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Comments are closed.