राष्ट्रपतींची ढवळाढवळ अन् श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ! अध्यक्ष शम्मी सिल्वा यांच्यासह संपूर्ण समितीचा राजीनामा
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांच्यासह संपूर्ण कार्यकारी समितीने आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांचा वाढता दबाव आणि बोर्डावर होत असलेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाचा कारभार पाहण्यासाठी सरकार आता लवकरच एका अंतरिम समितीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.
मात्र, सरकारच्या या थेट हस्तक्षेपामुळे श्रीलंका क्रिकेटवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयसीसी सरकारी हस्तक्षेपाच्या विरोधात असून, यापूर्वी 2023 मध्येही अशाच कारणामुळे श्रीलंकेवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी श्रीलंकेचा निधी रोखण्यासोबतच महत्त्वाच्या स्पर्धांचे यजमानपदही काढून घेण्यात आले होते.
एकीकडे प्रशासकीय गोंधळ सुरू असतानाच, दुसरीकडे श्रीलंकेची मैदानातील कामगिरीही खराब राहिली आहे. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक आणि नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघावर बरीच टीकाही झाली. मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखालीही संघात अद्याप फारशी सुधारणा झालेली नाही.
Comments are closed.