पडद्याआडून – ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’… बदलांच्या उंबरठ्यावर उभं असलेलं वास्तव
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवर वेगळ्या धाटणीची, विषयाच्या गांभीर्याला न्याय देणारी नाटके अधूनमधून येत असतात आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. ‘पुढच्या शुक्रवारी 7 वाजता’ हे असंच एक नवंकोरं नाटक सध्या रंगभूमीवर आलं असून त्याने आपल्या आशयाने आणि मांडणीने एक वेगळी छाप निर्माण केली आहे. सुदीप मोडक यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि नीरज शिरवईकर यांच्या दिग्दर्शनाखाली उभं राहिलेलं हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांचे बीज पेरतं.
नाटकाचा गाभा आहे; माणसाच्या आयुष्यातील बदल आणि त्या बदलांसाठी लागणारी मानसिक तयारी. व्यसनाधीनतेसारख्या गंभीर आणि समाजाने कडेला ढकललेल्या विषयाला हाताळताना लेखकाने कोणताही उपदेशात्मक सूर न लावता अत्यंत संवेदनशीलतेने कथा उभी केली आहे. कॉर्पोरेट जगातील महत्त्वाकांक्षी राधिका जोशी, झोपडपट्टीत राहणारा मंगेश गायकवाड आणि त्याला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी झटणारा मानसोपचारतज्ञ डॉ. अतुल मांकड या तीन प्रमुख पात्रांची ही तीन वेगवेगळी जगं नाटकात एकत्र येतात आणि त्यातून उलगडते ती मानवी नात्यांची, संघर्षांची आणि परिवर्तनाची कहाणी.
राधिका ही कॉर्पोरेट क्षेत्रात मोठय़ा पदावर आहे आणि तिला अजून वर जाण्यासाठी या झोपडपट्टीत राहणाऱया, पण जिनियस असलेल्या मंगेशची गरज आहे. पण ड्रग्जच्या विळख्यात अडकलेला मंगेश जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत तिचे काम तो करू शकणार नाही, याची जाणीव झाल्याने ती तिचा पूर्वाश्रमीचा मित्र असलेल्या डॉ. अतुलकडे आलीय. डॉ. अतुलने मंगेशवर मानसोपचार करावेत जेणेकरून तो तिचं मोठं काम करुन देऊ शकेल यासाठी ती विनंती करतेय. खरंतर आपण करत असलेल्या या कामाचा पंटाळा आलेला डॉ. अतुल सगळं बंद करून निनावी आयुष्य जगायला निघालाय. पण राधिकाच्या विनंतीला मान देऊन तो हे आव्हान स्वीकारतो आणि पुढे हे संपूर्ण नाटक घडतं.
सुदीप मोडक याचं लेखन हे नाटकाचं सर्वात मोठं बलस्थान म्हणावं लागेल. संवादांमध्ये सहजता आहे, पण त्याच वेळी ते धारदारही आहेत. पात्रांच्या मनातील घालमेल, त्यांचे अंतर्गत संघर्ष आणि त्यांची बदलण्याची धडपड अत्यंत वास्तवदर्शीपणे शब्दबद्ध झाली आहे. कुठेही कृत्रिम नाटकीपणा जाणवत नाही; उलट प्रत्येक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडू शकणारा वाटतो. सोबत नीरज शिरवईकर यांचं दिग्दर्शन हे या आशयाला योग्य न्याय देणारं ठरतं. त्यांनी नाटकाचा वेग, त्यातील शांतता आणि प्रसंगांची उकल यांचा उत्कृष्ट समतोल साधला आहे. विशेष म्हणजे, नाटकात काही ठिकाणी येणारी शांतता हीच प्रेक्षकांशी संवाद साधते, ती शब्दांपेक्षा अधिक बोलकी ठरते. रंगमंचावरील मांडणी साधी असली तरी ती प्रभावी आहे आणि कथानकाला पूरक ठरते. नेपथ्य सुटसुटीत आहे, विशेषतः धारावीच्या झोपडपट्टीचा सेट उल्लेखनीय.
अभिनयाच्या बाबतीतही नाटक प्रभाव पाडतं. राधिका, मंगेश आणि डॉ. अतुल या तिन्ही प्रमुख व्यक्तिरेखा त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांच्या मनात घर करतात. विशेषतः मंगेशच्या व्यक्तिरेखेतून दिसणारा अंतर्गत संघर्ष आणि त्याच्यामध्ये हळूहळू होत जाणारा बदल हा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. राधिकेची महत्त्वाकांक्षा आणि तिच्यात होणारी जाणीवांची प्रक्रिया, तसेच डॉ. अतुल यांची सामाजिक बांधिलकी हे तिन्ही पैलू नाटकाला अधिक परिपूर्ण करतात. राधिकेच्या भूमिकेत चैत्राली गुप्ते मोठय़ा गॅपनंतर रंगमंचावर आल्या आहेत. त्यांनी त्यांचे काम समजून केले असले तरी भूमिकेच्या अंतरंगात शिरणे गरजेचे आहे. इतर दोघांच्या तुलनेत त्या कमी पडतायत. मंगेशच्या भूमिकेत सुदीप वेगळेच रंग भरतो. तो स्वतः लेखक असल्याने त्याला तो टोन सापडलाय. काही प्रसंगात त्याने अवाजवी आक्रस्ताळीपणा केलाय खरा, पण तो भाव खाऊन जातो. सर्वात कमाल केलीय ती सतीश राजवाडे यांनी. त्यांच्या भूमिकेतील सहजता वाखाणण्याजोगी आहे. सोबत त्यांचा फिजिकल फिटनेस दिसतो आणि जाणवतो. कटू भूतकाळ असलेला एक तत्त्वनिष्ठ आणि निरीच्छ मानसोपचारतज्ञ त्यांनी अचूक दाखवलाय.
सोबत काही त्रुटी आढळतात. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलांची व्यसनमुक्तता ही इतक्या सरळ रेषेत होत नाही. तसेच हायपर झाल्यानंतर लगेचच एक गोळी देऊन तो रुग्ण, वारंवार सामान्य झालेला दाखवणे हे खटकते. तसेच ही तीन मुख्य पात्रे वगळता इतर दोन पात्रांचे प्रयोजन काय? हा प्रश्न पडतो. ती नसती आणि त्यांची जागा संवांदातून भरून काढता आली असती तर परिणामकारकतेत भर पडली असती. तसंच राधिकेच्या कामाचं स्वरूप आणि तिची एपंदर देहबोली यांचा ताळमेळ बसत नाही. काही प्रसंग अजून धारदार करता येतील. इतरही काही गोष्टी दाखवल्या आहेत तितक्या सहजपणे खऱया आयुष्यात घडत नाहीत.
हे नाटक केवळ एका व्यक्तीच्या व्यसनमुक्तीची कथा नाही; ती आहे समाजाच्या बदलत्या मानसिकतेची आणि त्या बदलात प्रत्येकाने उचलायच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी गोष्ट. आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनात माणूस कुठे हरवत चालला आहे आणि त्याला परत मार्गावर आणण्यासाठी काय आवश्यक आहे, याचा वेध हे नाटक घेतं. एपंदरीत, ‘पुढच्या शुक्रवारी 7 वाजता’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाची भर ठरते. ते प्रेक्षकांना केवळ दोन-अडीच तास गुंतवून ठेवत नाही, तर प्रसंगी त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडतं. अशा प्रकारचं आशयघन आणि विचारप्रवर्तक नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं हीच खरी अपेक्षा आहे.
लेखक: सुदीप मोडक
दिग्दर्शक: नीरज शिरवईकर
कलाकार: सुदीप मोडक, चैत्राली गुप्ते, सतीश राजवाडे
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाश: शीतल तळपदे
संगीत: राहुल रानडे
निर्माता: चौरंगी एंटरटेनमेंट
सूत्रधार: नितीन नाईक
छायाचित्र सौजन्य: संजय पेठे
Comments are closed.