हैदराबादने केले मुंबईला बाद, 244 धावांच्या डोंगरानंतरही मुंबईचा सहावा पराभव; सलामीवीर रायन रिकल्टनची नाबाद शतकी खेळी वाया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायन रिकल्टनच्या 55 चेंडूंतील 123 धावांच्या अभेद्य खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला वानखेडेवर जिंकता आले नाही. अभिषेक शर्मा-ट्रव्हिस हेडची झंझावाती सलामी आणि त्यानंतर हेन्रिक क्लासनने केलेल्या 60 धावांच्या क्लासिक खेळीने हैदराबादला आठ चेंडू आधीच विजय मिळवून दिला आणि मुंबईचे आयपीएलमधील आव्हानही जवळजवळ संपुष्टात आणले. सलग सहा पराभवानंतर मुंबईला आता जर-तरचा चमत्कार वाचवू शकतो आणि जर-तर हे दुसऱ्या च्या खेळावर अवलंबून असल्यामुळे पाच वेळा विजेता ठरलेल्या मुंबईवर सर्वप्रथम गटातून बाद होण्याची नामुष्की ओढावली आहे.

सात सामन्यात केवळ 2 विजय मिळवणाऱ्या  मुंबईकडून वानखेडेवर चमत्काराची अपेक्षा होती आणि रिकल्टनने शतकी नजराणा पेश करत मुंबईला 5 बाद 243 धावांचा डोंगर उभारून दिल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह वाढला होता. पण 244 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अभिषेक आणि ट्रव्हिस हेडने 6.3 षटकांत शंभरी गाठून दिली. या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबईच्या विजयावर पराभवाचे सावट आले. दोघांनी मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांवर कसलीही दयामाया दाखवली नाही.

जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीही या दोघांना वेळीच आवरु शकली नाही. बुमराच्या 4 षटकांत 54 धावा फोडून काढल्या. बुमराला एकही विकेट टिपता आला नाही. त्यामुळे मुंबईत नैराश्याचे वातावरण पसरले. त्यानंतर नवव्या षटकात गझनफरने सलग चेंडूंवर अभिषेक आणि इशान किशन यांची विकेट काढत मुंबईला विजयाची एक आशा दाखवली होती. पण ती आशा क्लासनने हळूच धुडकावून लावली. त्यानेही त्याच अंदाजात फलंदाजी करत हैदराबादचा मोठा विजय निश्चित केला. हेडने 30 चेंडूंत 76 धावा ठोकल्या तर क्लासनने 30 चेंडूंत नाबाद 65. या सामन्यात हैदराबादने 18 षटकार आणि 20 चौकारांची बरसात केली.  मुंबईकडून रिकल्टनला साथ विल जॅक्सने दिली. त्यामुळेच मुंबई अडीचशेसमीप पोहोचू शकली.

Comments are closed.