थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धा – हिंदुस्थान उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तायपेईशी भिडणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा पुरुष बॅडमिंटन संघ प्रतिष्ठेच्या थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी (दि. १) चायनीज तायपेईच्या संघाशी दोन हात करणार आहे. या लढतीत विजय मिळवत हिंदुस्थान दुसऱ्या किताबाच्या दिशेने पुढे जाण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये हिंदुस्थानने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच थॉमस कप जिंकला होता.

यंदाच्या स्पर्धेत हिंदुस्थानने ‘गट-अ’मध्ये दुसरे स्थान पटकावत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आता त्याच्यासमोर असा संघ उभा आहे, ज्याने अद्याप थॉमस कप जिंकलेला नाही; पण सध्याच्या फॉर्ममुळे तो अत्यंत धोकादायक मानला जात आहे.

दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास

हिंदुस्थानने आपल्या मोहिमेची सुरुवात दणक्यात करत कॅनडावर ४-१ अशी मात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ५-० असा धुव्वा उडवला. मात्र, चीनविरुद्धच्या लढतीत जोरदार झुंज देऊनही हिंदुस्थानला २-३ अशी निसटती हार पत्करावी लागली.

चायनीज तायपेईचा संघ कागदावर अत्यंत बलाढ्य दिसतो. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील चोऊ टीन-चेन संघाचे नेतृत्व करीत आहे. त्याला साथ देताना आठव्या क्रमांकाचा आणि विद्यमान ऑल इंग्लंड विजेता लीन चूंन-यी तसेच २१व्या क्रमांकाचा ची यू-जेन एकेरीमध्ये भक्कम आव्हान उभे करतात. दुहेरीत चियू सियांग चीह-वांग ची-लिन (जागतिक क्रमांक १४) आणि ली झे-हुई-यांग पो-सुआन (क्रमांक १६) या जोड्या प्रतिस्पध्र्थ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

हिंदुस्थानची ताकद आणि इतिहास

हिंदुस्थानचा युवा खेळाडू आयुष शेट्टी फॉर्ममध्ये असून, त्याने या स्पर्धेत आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत. याआधी बॅडमिंटन एशिया चॅम्पियन्सशिप्समध्ये तो उपविजेता ठरला होता. हिंदुस्थानने २०२२ मध्ये किताब जिंकून इतिहास घडविला होता. १९५२, १९५५ व १९७९ साली हिंदुस्थानने कांस्यपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे.

Comments are closed.