पीबीजी पुणे जग्वार्स संघाची दिया चितळेवर पुन्हा विक्रमी बोली! UTT लिलावात सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत
संघाची सर्वोत्तम मोर्चेबांधणी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या पीबीजी पुणे जग्वार्सने अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) स्पर्धेच्या ७व्या हंगामाच्या लिलावात पुन्हा एकदा धडाकेबाज चाल खेळली. संघाने स्टार पॅडलर दिया चितळे हिच्यावर सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी बोली लावत तब्बल ३७.४ लाख टोकन्स मोजले आणि प्रतिस्पर्थ्यांना सरळ इशाराच दिला.
दियानेही अपेक्षांवर शिक्कामोर्तब करत सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवणारी हिंदुस्थानी खेळाडू ठरत आपले वर्चस्व कायम ठेवले. पुण्याच्या संघासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरणारी दिया यंदाही संघाच्या रणनीतीचा केंद्रबिंदू असणार हे स्पष्ट झाले.
पुणे जग्वार्सने फक्त देशी ताकदीवर समाधान न मानता अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले. फ्रान्सची प्रीतिका पावाडे आणि इजिप्तचा ओमर असार यांना संघात घेत संघाला जागतिक दर्जाची धार मिळवली. त्यातच स्नेहित एसएफआर, मुदित दानी आणि सायनिका माजी यांसारख्या खेळाडूंना संधी देत संघ अधिक संतुलित आणि भक्कम केला.
लिलावानंतर स्पर्धेच्या सहप्रवर्तक विटा दानी यांनीही संघाच्या आक्रमक रणनीतीचे कौतुक केले. ‘अनुभव, युवा जोश यांचा मेळ या लिलावात दिसून आला ही स्पर्धेसाठी सकारात्मक बाब आहे,’ असे त्या म्हणाल्या. आता कागदावर ‘सुपर टीम’ दिसणारा पीबीजी पुणे जग्वार्स मैदानातही तितकाच आक्रमक खेळ दाखवतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सात संघांच्या या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध भिडणार असून, अव्वल चार संघ बाद फेरीत प्रवेश करणार आहेत. पुण्याचा ‘जग्वार’ यंदा खरंच गरजणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘दिया चितळे ही आमची ‘गेम चेंजर’ खेळाडू आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये ती गणली जाते. ती आमच्या योजनांचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भोवती आम्ही संतुलित आणि सक्षम संघ उभारण्यावर भर दिला आहे.’
पुनीत बालन, (संघमालक, पीबीजी पुणे जग्वार्स)
Comments are closed.