शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांची बागेश्वर बाबावर टीका
सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji Maharaj) महाराष्ट्रासह जगभरातील मराठी बांधवांना आणि देशवासीयांना अभिमान आहे. त्यामुळे, शिवरायांच्या इतिहासाच्या अनुषंगाने नेहमीच वाद समोर येतात. इतिहासातील दाखले देताना कुणी चुकीचा किंवा सोयीस्कर इतिहास पसरवत असल्यावरुन दोन गट एकमेकांवर टीका करत शाब्दिक वाद निर्माण करतात. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर भाष्य केल्यानं वाद निर्माण झाला होता. आता, त्या वादावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रश्न उपस्थित केल आहेत.
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या नावावरुन वाद निर्माण केला, तर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुनही वाद समोर आला होता. आता, या वादावर राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न
अलीकडे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची पदोपदी संधी काही लोक शोधत आहेत. राज्याचे प्रमुख स्टेजवर असताना बागेश्वर बाबाने काही चुकीचे दाखले दिले. महाराजांच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. पुढच्या काही वर्षांमध्ये इतिहास अशाच पद्धतीने लिहिला जाईल. आता, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं हे पाप कुणी केलं हे शोधून काढावे लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटलं. NCERT च्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याच्या निर्णयाविरोधात सांगलीत निघालेल्या निषेध आणि मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चामध्ये जयंत पाटील बोलत होते. आजकाल काहीतरी विषयावरून खडा टाकायचा आणि लोक काय करतात हे पाहायचे अशी वृत्ती पसरत असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.