घुमला महाराष्ट्राचा जयजयकार! राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ध्वजारोहण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

105 हुतात्म्यांच्या बलिदानातूनमध्ये 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मृतींना उजाळा देत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'च्या जयघोषात राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला गेला. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचा जयजयकार घुमला.

महाराष्ट्राचा आज 66 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्पवर आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने ध्वजाला मानवंदना दिली. राज्यपाल वर्मा यांनी जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तही शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, मुंबई पोलिसांच्या विविध तुकड्या, अग्निशमन दल, महापालिका सुरक्षा दल व अन्य यंत्रणांनी सहभाग घेतला. राज्याची प्रगती आणि संस्कृती दर्शवणारे चित्ररथ हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ‘वर्षा’ निवासस्थानीही ध्वजारोहण केले. राज्याच्या विविध विभागीय व जिल्हा मुख्यालयांवर पालकमंत्री व अन्य मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Comments are closed.