फ्लॉपपासून सुपरस्टारपर्यंत! केएल राहुलच्या यशामागे प्रीती झिंटाचा हात?
आयपीयल मधील यशस्वी प्रवासासाठी आत्मविश्वास आणि योग्य वेळी मिळालेला विश्वास किती महत्त्वाचा असतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे के एल राहुल आहे. 2018 साली प्रिती झिंटाने दाखवलेल्या विश्वासामुळे राहुलच्या करिअरला नवे वळण मिळाले आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
राहुलचा आयपीयल प्रवास 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू कडून सुरू झाला. त्यानंतर त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि पुन्हा आरसीबीकडून खेळत असताना काही झलक दाखवली, मात्र अपेक्षित सातत्य मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ असा शिक्का बसला. 2017 मध्ये दुखापतीमुळे ते संपूर्ण हंगामाबाहेर राहिले आणि त्यांचे आयपीयल करिअर संपल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र 2018 च्या लिलावात पंजाब किंग्ज (त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब) ने राहुलवर तब्बल 11 कोटी रुपयांची बोली लावली. हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने धक्कादायक होता. टी-20 क्रिकेटसाठी ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाजावर एवढी मोठी रक्कम खर्च केल्यामुळे संघ व्यवस्थापनावर टीका झाली. पण हाच निर्णय पुढे गेमचेंजर ठरला.
राहुलने पहिल्याच सामन्यात 14 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम प्रस्थापित केला आणि सर्व टीकाकारांना जोरदार उत्तर दिले. त्या हंगामात त्याने 14 सामन्यांत 659 धावा करत आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर ते संघाचे कर्णधारही बनले आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिले.
2018 ते 2025 या कालावधीत राहुलने एकदाच 500 धावांखाली मजल मारली. त्याच्या स्ट्राइक रेटवर नेहमी टीका झाली, मात्र अलीकडच्या हंगामात त्यानी यात मोठी सुधारणा केली आहे. 2025 मध्ये त्यांनी 149.72 स्ट्राइक रेटने 539 धावा केल्या, तर आयपीयल 2026 मध्ये ते 185.84 स्ट्राइक रेटने 433 धावा करून दमदार फॉर्ममध्ये आहेत.
विशेष म्हणजे 2018 नंतर राहुलने सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारही जिंकले आहेत. त्यांच्या खात्यात 17 वेळा हा मान गेला आहे, जो इतर खेळाडूंहून अधिक आहे. यावरून त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची प्रचिती येते.
एकूणच, योग्य वेळी मिळालेल्या विश्वासामुळे केएल राहुल आज आयपीयल मधील अव्वल फलंदाजांपैकी एक बनले आहेत.
Comments are closed.