छत्तीसगडमध्ये तीन डीआरजी जवान शहीद झाले

आयईडी स्फोट : कांकेर-नारायणपूर सीमेवर सुरुंग निकामी करताना दुर्घटना

वृत्तसंस्था/ जगदलपूर, कांकेर

छत्तीसगडमधील कांकेर-नारायणपूर सीमेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) तीन जवान हुतात्मा झाले. शनिवारी सकाळी कोरोस्कोडा जंगलात शोधमोहिमेवर असताना सुरक्षा दलाच्या पथकाला मोठा दणका बसला. या दुर्दैवी घटनेत डीआरजी पोलिसांचे एक पथक नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी निकामी करत असताना त्याचा अचानक स्फोट झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या प्रकरणाचा तपास सुरू असून घटनेशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे.

सुरक्षा दलाचे एक पथक सुरुंग निकामी करणे, परिसरावर नियंत्रण मिळवणे आणि शोधमोहिमेवर असताना छत्तीसगडच्या कांकेर जिह्यात स्फोटाची दुर्घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे पथक परिसरात आधीच पेरलेले आयईडी शोधून निकामी करत होते. अचानक एका आयईडीचा स्फोट होऊन चार जवान जखमी झाले. इन्स्पेक्टर सुखराम वट्टी, कॉन्स्टेबल कृष्णा कोमरा आणि कॉन्स्टेबल संजय गडपाले हे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आणखी एक जखमी जवान कॉन्स्टेबल परमानंद कोमरा यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

गेल्या काही महिन्यांत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आणि इतर गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बस्तर परिसरात मोठ्या संख्येने आयईडी जप्त करून निकामी केले आहेत. नक्षलवाद्यांनी यापूर्वी लपवून ठेवलेले शेकडो आयईडी या परिसरात अजूनही आहेत. त्यांचा शोध व त्यांना निकामी करण्याची मोहीम सातत्याने सुरू असल्याचे बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टिलिंगम यांनी सांगितले.

31 मार्च रोजी छत्तीसगडला अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले. तेव्हापासून नक्षलवादी कारवायांशी संबंधित मोठ्या स्फोटाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बस्तर भागातील घनदाट जंगलांमध्ये नक्षलवाद्यांनी पूर्वी पेरलेले भूसुरुंग सुरक्षा दल आणि स्थानिक रहिवाशांसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. हे सुरुंग हटवण्यासाठी मोहीम सुरू आहे, परंतु धोका कायम आहे.

 

Comments are closed.