देखणे न देखणे – कवितेतील बंध-अनुबंध

>> डॉ. मीनाक्षी पाटील ([email protected])

कवितेची भाषा नादलयीच्या स्तरावर मुक्त विहार करते तर कधी नियमांनी स्वतला बांधून घेताना दिसते. यातूनच काव्यात्म, सौंदर्यसर्जक भाषा आकाराला येते. कवितेच्या या भाषेतील मूर्तअमूर्ताचा सर्जक खेळ अनोख्या अशा प्रातिभासिक विश्वाची निर्मिती करतो

सारे मानवी अस्तित्व दृश्य-अदृश्य, मूर्त-अमूर्त विचाराने व्यापलेले आहे. मानवी मनाला दृश्य जगताविषयी जितकी ओढ आहे तितकीच तीव्र ओढ त्याला अदृश्य जगताविषयीदेखील आहे. या अदृश्याविषयीच्या कुतूहलातूनच मानवी जगण्यात रंजकता निर्माण झाली असून माणसे विविध कलांच्या माध्यमातून या दृश्य-अदृश्याचा, मूर्त-अमूर्ताचा शोध घेत आली आहेत. गेल्या वेळच्या लेखापासून आपण साहित्यकलेतील ‘कविता’ या आकृतिबंधातून व्यक्त होणाऱया मूर्त-अमूर्ताचा वेध घेत आहोत.

सामान्य माणसे आणि कवी जरी एकाच वास्तवाचा भाग असले तरी त्या वास्तवाकडे बघण्याचा दोघांचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा असतो. आपल्या प्रतिभाशक्तीने कवी आपल्या कवितेतून एका अनोख्या अशा प्रातिभासिक विश्वाची निर्मिती करतो. त्यामुळे दैनंदिन जगण्यातलीच भाषा त्या प्रातिभासिक विश्वात मात्र एक वेगळेच रूप धारण करते. गेल्या लेखात ‘भाकरीचा चंद्र’ या उदाहरणातून आपण ते पाहिले. सर्वसामान्य वापरामध्ये भाषा ही दैनंदिन व्यावहारिक संदेशनासाठी वापरली जाते, परंतु कवितेची भाषा ही संदेशनापलीकडे जाते. या अर्थाने भाषेची संदेशनात्मक आणि सौंदर्यात्मक / कलात्मक अशी दोन कार्ये आहेत.

दैनंदिन व्यवहारातील प्रमाणभाषेमध्ये आपण एक सर्वसामान्य नियमावली स्वीकारलेली असते आणि त्या नियमावलीनुसार आपला सारा भाषिक व्यवहार चाललेला असतो. याउलट कवितेच्या भाषेत मात्र या व्यवहारातील प्रमाण भाषेतील व्याकरणिक नियमांचे, संकेतांचे, रूढींचे उल्लंघन केले जाते. थोडक्यात, भाषेचे सौंदर्यात्मक कार्य हे ‘संकेतोल्लंघना’वर वा नियमोल्लंघनावर आधारलेले असते. अर्थात हे नियमोल्लंघन म्हणजे भाषिक नियम किंवा संकेत ‘मोडणे’ नव्हे तर त्यांना काव्यात्मरीत्या ‘वाकवणे’ असते असे म्हणता येईल. कारण भाषेचे नियम थेट मोडले तर दुर्बोधता निर्माण होते, पण तेच नियम वाकवले तर भाषेतल्या मूळ नियमांचे सूचन होण्यासोबतच भाषेचा काव्यात्म वापरही सिद्ध होतो. झेक संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ मुकारोव्हस्की याने या ‘नियमोल्लंघना’विषयी (इदुदल्ह्ग्हु) विस्ताराने विवेचन केले आहे.

भारतीय साहित्यशास्त्रातील याच संदर्भात केलेल्या व्यंजनाविचाराविषयीदेखील आपण मागील लेखात पाहिलेच आहे.कवितेतील हे नियमोल्लंघन प्रमाणभाषेतील व्याकरणिक नियमांच्या पार्श्वभूमीवर जसे होते तसेच ते काव्यसंकेतांच्या, आदर्शांच्या तसेच औचित्यकल्पनांच्या पार्श्वभूमीवरही होत असते. कवितेच्या संदर्भात कवितेच्या विषय-आशयापासून कवितेतील प्रतिमा, प्रतीके, रूपके, अलंकार इ. इ. अशा सर्व काव्य घटकांच्या प्रस्थापित नियमसंकेतांचे ते उल्लंघन असते. थोडक्यात, कवी नियमोल्लंघन करतो म्हणजे वाचकांचे लक्ष वेधले जाईल अशा वैशिष्टय़पूर्ण भाषाविशेषांचा वापर करतो. भाषेच्या पारंपरिक वापरापेक्षा चमत्कृतीपूर्ण, अपरिचित अशा सौंदर्यात्मक वापरावर कवी लक्ष वेधतो. अगदी उदाहरणच द्यायचे तर हेमंत दिवटे यांच्या ‘ब्रँडेवाची आरती’ या कवितेचे देता येईल. विविध सण-उत्सवांना आपण वेगवेगळ्या देवांच्या आरत्या करतो. आरती म्हणजे सर्वशक्तिमान अशा ईश्वराचे गुणगान मानले जाते. पण आजच्या उत्तर-आधुनिक काळात कवी हेमंत दिवटे ‘जशी शॉपिंग तसा धर्म / जसा ब्रँड तशी जात / आहे पैसा ये आत’ असे म्हणून विविध ब्रँडस्ना प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व मार्मिकतेने अधोरेखित करतात. ‘जय देवा जय देवा’ या आपल्या मनातल्या आरतीच्या सर्वपरिचित ओळींच्या विरचनेतून, नियमोल्लंघनातून खूपच वेगळ्या पद्धतीने, चमत्कृतीपूर्ण अशा स्वरूपात ब्रँडेवाची आरती साकारतात –

एक प्रार्थना सुरू झालीय

‘ब्रॅण्डेवा ब्रॅण्डेवा सकलांच्या देवा’

जगभर एकाच वेळी एकाच क्षणी एकाच देवाची

लोक पूजा करतात, काय हरकत आहे!

नाही उरलंय

आस्तिक-नास्तिक

असं काहीही शिल्लक

जय जय जय जय…

आयडेन्टिटी ओवाळू, भाषाही ओवाळू

संस्कृती ओवाळू, स्वतला ओवाळू

तुज ब्रॅंण्डदेवा, जयदेव जयदेव…

कवितेतल्या भाषेविषयी कवीकडून घेण्यात आलेल्या  सौंदर्यलक्ष्यी स्वातंत्र्याचे दर्शन वरील उदाहरणावरून स्पष्ट होते. देवाच्या आदिप्रतिमेचा वापर आपल्या कवितेतून करताना कवी तिच्याभोवती गुंफलेल्या भावसंदर्भांचे, अर्थसंकेतांचे, पौराणिक भावविश्वातील संकेतांचे व संदर्भांचे उल्लंघन करतो. हे उल्लंघन करतांना ब्रँडेवाच्या प्रतिमेतून कल्पकतापूर्ण असे नवनवे अर्थ निर्माण करतो. अशा प्रकारच्या संकेत-नियमांच्या उल्लंघनातून काव्यात्म, सौंदर्यसर्जक भाषा आकाराला येत असते.

आपण वर मुक्तछंदातील कवितेचे उदाहरण पाहिले, ज्यामध्ये भाषा नियमोल्लंघन करताना दिसते. पण बऱयाच वेळा कवितेची भाषा नादलयीच्या स्तरावर काही वेगळ्याच नियमांनी स्वतला बांधूनही घेताना दिसते. उदा . बा.भ. बोरकरांची अनुप्रास अलंकाराचे उदाहरण असलेली खालील कविता –

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले

शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

अशा प्रकारे बऱयाचदा छंद, वृत्त, सुनीत-मुक्त सुनित इत्यादी छंदोबद्ध पद्यप्रकारात कविता स्वतवर नादलयीचे नियम लादून घेताना दिसते. कवितेतील शब्द, शब्दबंध, वाक्यबंध, प्रास, अनुप्रास, यमकादी शब्दालंकार यासारख्या काव्यघटकांच्या प्रमाणबद्ध पुनरावृत्तीने कविता एका नादलयीत स्वतला बांधून घेताना दिसते. अशाप्रकारे काही वेळा वैशिष्टय़पूर्ण नियमोल्लंघनाद्वारे तर काही वेळा अतिरिक्त नियमबंधनाद्वारे कवितेची भाषा मूर्त-अमूर्ताचा सर्जक खेळ खेळत असते.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिवकवयित्री, चित्रकार आहेत.)

Comments are closed.